मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी धोका अजूनही कायम आहे. कोरोना रुग्णांमध्ये दररोज होत असलेली वाढ लॉकडाऊनमुळे कमी होत असल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी १ जूननंतर लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची शक्यता कमीच आहेच.
राज्यात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी 10 ते 15 जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरमायकोसिसचा धोकाही वाढतोय. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर पोहचली होती. आजची राज्यातील रुग्ण संख्या कमी होऊन सप्टेंबरच्या आकडेवारी एवढी झाली आहे.
आज एकदम लॉकडाऊन न उठवता तो 1 जूननंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यादृष्टीने विभागास निर्देश दिले आहेत.
राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असला तरी म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. पण आता कोरोनावर मात केल्यानंतर ही इतर आजारांचा धोका वाढत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर तरुण वर्गामध्ये देखील काही दिवस वेगवेगळे साईड इफेक्ट दिसत आहेत. जे चिंता वाढवणारे आहेत.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
'लॉकडाऊनबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की याबाबत वेगळी चर्चा करू, रेड झोनमध्ये अजूनही काही जिल्हे आहेत. आता रुग्ण कमी होत असले तरी गेल्या लाटेतील उच्चांकी आकडा आहे. आता 64 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहे. तज्ज्ञांचे मत घेऊन टप्प्याने निर्बंध उठवू.' अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.