मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनाची दखल घेत या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता. आरक्षणाबाबत राज्य सरकार आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. मागासप्रवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आली आहे.
सोमवारी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलवली होती. राज्यभरात सुरू असलेल्या मराठा मोर्चाकडे दिल्ली बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मराठा मोर्चाला मिळालेले वळण पाहता ही कोंडी फुटणार कशी, याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीमुळे आता हा प्रश्न दिल्लीश्वरांच्या कृपेनेच सुटणार की काय अशी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.