मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. 2014 च्या निवडणुकांमधील प्रचारसभेच्या प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निवडणुकांच्यावेळी केजरीवाल, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच मीरा सन्याल यांनी पोलिसांची परवानगी न घेता 'आप' उमेदवारांसाठी प्रचारसभा काढल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत प्रचार सभा घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी 2014 मध्ये लोकसभेचा प्रचार करताना या तिघांनी घेतली नव्हती, असा आरोप होता. परंतु पोलिसांनी तिन्ही आरोपींना प्रचार सभेची परवानगी नाकारत आहोत, असे पत्र दिले नव्हते. त्यामुळे ही बाब शुक्रवारी न्यालयाने निदर्शनास आणले. न्यायदंडाधिकारी पी. के. देशपांडे यांनी केजरीवालांची या मुद्यावरून मुक्तता केली आहे.
'आप'च्या तिकिटावर मीरा सन्याल आणि मेधा पाटकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी मानखुर्दमध्ये सभा घेतली होती. या सभेला परवानगी नव्हती आणि नियोजित नव्हती, असा दावा करण्यात आला होता. आजच्या निकालाच्यावेळी अरविंद केजरीवाल आणि मीरा सन्याल न्यायालयात उपस्थित होते.