अंधेरीतील भंगार गोडाऊनला भीषण आग, अनेक झोपड्या आगीत भस्म

मुंबईतील अंधेरी (पूर्व) एमआयडीसी परिसरातील सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 2, 2024, 09:07 AM IST
अंधेरीतील भंगार गोडाऊनला भीषण आग, अनेक झोपड्या आगीत भस्म  title=

मुंबईच्या अंधेरी (पूर्व) एमआयडीसी परिसरात सुभाष नगरमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. मारुती शाळेजवळील भांगरवाडी झोपडपट्टीत सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक आपले कुटुंब आणि सामान घेऊन सुरक्षित ठिकाणी पळू लागले.

सुभाष नगरमधील बहुतांश लोक हे कामगार वर्गातील असून दिवाळीच्या सुटीमुळे ते घरी आले होते, असे स्थानिक रहिवासी योगेश चंद गौतम यांनी सांगितले. पावसापासून बचाव करण्यासाठी झोपड्यांवर आजही प्लास्टिक टाकले जाते. फटाक्यांमुळे प्रथम एका झोपडीला आग लागली, त्यानंतर अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या अंधेरी पूर्वेकडील भांगरवाडी परिसरात पोहोचल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, झोपडपट्टीत असलेल्या एका गोदामाला आग लागली, ती विझवण्याचे काम सुरू आहे. अधिका-याने सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आठ वाजण्याच्या सुमारास सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या सध्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले होते. गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याचे सांगितले जाते. 

आगीचे कारण अस्पष्ट 

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल अंधेरी पूर्व येथील भंगारवाडी येथे पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरू आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे कारण शोधले जाईल. अजूनही मदतकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या भागातील रहिवाशांनाही हलवण्यात आले आहे. खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

नागरिकांना इशारा 

अंधेरी पूर्व येथील भंगारवाडी परिसरात काही तासांपूर्वी भीषण आग लागली. परिसरातील सर्व अंधेरीकरांना मी सुचित करू इच्छितो की अग्निशमन दलाच्या मदतीने आता आग विझवण्याचे काम सुरु आहे. तरी माझी या परिसरातील सर्वांना विनंती आहे की कृपया विनाकारण बाहेर पडू नका. स्थानिकांची मदत व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आम्ही अजूनही घटनास्थळी उपस्थित आहोत. या दुर्घटनेत कोणी गंभीर जखमी नाही झाले व सुदैवाने कोणाची जीवितहानी झाली नाही. आपली काळजी घ्या, सुरक्षित रहा. ही माहिती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अंधेरी पूर्वमधील उमेदवार मुरजी पटेल यांनी दिले.