म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळले

Mumbai Mhada Lottery 2024: मुंबई म्हाडा मंडळाने 2024 साठी घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 2, 2024, 08:27 AM IST
म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळले  title=
Mumbai Mhada Lottery 2024 Opportunity for waiting list winners for about 442 houses in mumbai

Mumbai Mhada Lottery 2024: म्हाडा मुबंई मंडळाने ऑक्टोबर 2024 साठी 2030 घरांची लॉटरी जारी केली होती. मागील महिन्यातच या घरांची लॉटरी जाहीर झाली होती. या लॉटरीमुळं अनेकांचे मुंबईत घराचे स्वप्न साकार झाले आहे. मात्र, ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांच्यासाठीही एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील २०३० घरांच्या सोडतीतील स्वीकृती पत्र सादर केलेल्या आणि निवासी दाखला प्राप्त झालेल्या घरांच्या विजेत्यांकडून सदनिकेची विक्री किंमत भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे आता मंडळाने परत (सरेंडर) केलेल्या ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाकडून येत्या काही दिवसातच प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे. प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर ही आनंदाची बातमी ठरणार आहे. ऐन दिवाळीतच अर्जदारांना घरांची लॉटरी लागणार आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात आली. या सोडतीत २०३० घरांपैकी १३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात २०१७ घरांसाठीच सोडत काढण्यात आली. या सोडतीतील विजेत्यांपैकी १५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिली आहे.

स्वीकृती दिलेल्यांपैकी ज्यांच्या घरांना निवासी दाखला प्राप्त झाला आहे अशा ३०० हून अधिक विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र वितरित करण्यात आले आहे. तात्पुरते देकार पत्र प्राप्त विजेत्यांकडून सदनिकेची विक्री किंमत भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जे विजेते सदनिकेची १०० टक्के रक्कम भरतील त्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता परत करण्यात आलेल्या ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली. या निर्णयानुसार लवकरच प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना स्वीकृती पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिल्यानंतर त्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

म्हाडाच्या सोडतीच्या नवीन धोरणानुसार प्रतीक्षा यादी कमी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २०२३ मध्ये १० घरामागे मागे एक अशी प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती. परिणामी मागील वर्षी प्रतीक्षा यादीवरील विजेते कमी असल्याने मोठ्या संख्येने घरे रिक्त राहिली. ही घरे २०२४ च्या सोडतीत समाविष्ट करण्याची वेळ मुंबई मंडळावर आली. ही बाब लक्षात घेता मुंबई मंडळाने २०२४ च्या सोडतीत प्रतीक्षा यादी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२४ च्या सोडतीत १० घरामागे पाच अशी प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने घरे रिक्त राहणार नाहीत. एकूणच आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. प्रतीक्षा यादीवरील प्राधान्य क्रमानुसार पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याने घर नाकारल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांचे लक्ष स्वीकृती पत्र प्रक्रिया पूर्ण होण्याकडे लागले आहे.