पक्षविरोधी काम करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाईचे संकेत

काँग्रेस काय कारवाई करणार याकडे लक्ष

Updated: May 7, 2019, 07:54 PM IST
पक्षविरोधी काम करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाईचे संकेत title=

दीपक भातुसे, मुंबई : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अथवा आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्या आमदारांवर काय कारवाई करायची याबातचा निर्णय काँग्रेस पक्ष या आठवड्यात करण्याची शक्यता आहे. येत्या १० तारखेला काँग्रेसची मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत विविध विषयांबरोबरच पक्ष विरोधी काम करणाऱ्या आमदारांच्या भवितव्याबाबतही चर्चा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला आव्हान देत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मदत केली. काही आमदारांनी तर उघडपणे भाजपा आणि शिवसेना उमेदवारांसाठी काम केलं. यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर, कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. यात विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाने स्वीकारला आहे, मात्र त्यांच्यावर अन्य कोणतीच कारवाई झालेली नाही. 

केवळ अब्दुल सत्तार यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र पक्षविरोधी काम करणाऱ्या इतर आमदारांवर मात्र पक्षाने काहाही कारवाई केलेली नाही. येत्या १० मे रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत येत्या १० तारखेला काँग्रेसच्या  होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.