गजानन देशमुख ( प्रतिनिधी) Parbhani : पूर्वीच्या काळात शेती, व्यवसाय आणि नोकरी असा प्राधान्यक्रम होता. मात्र, लग्न जुळवताना विविध कारणांमुळे या प्राधान्यक्रमात काही बदल झाल्यानं आता शेतकरी मुलांची लग्न रखडली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना कारभारीण मिळणं कठीण झालंय.अनेक प्रयत्न करूनही लग्नच होत नसल्यांनं ग्रामीण भागातील तरूण तणावात असल्यानं त्यातून एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालाय.
तुळशी विवाह होताच लग्नांचा धुमधडाका सुरू झालाय. मोबाईल अॅपवर मुला-मुलींसह स्थळ शोधण्याच्या कार्यक्रमालाही वेग आलाय. मात्र, यामध्ये शेतकरी मुलांची फरफट होताना दिसून येतेय. सध्या शहरात नोकरी करणाऱ्या मुलांनाच मुली पसंती देत असल्यानं शेतकरी नवरा नको गं बाई अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानं मराठवाड्यातील शेतकरी मुलांची परिस्थिती ओसाड माळरानासारखी झालीय. शेतकरी मुलांची लग्न होत नसल्यानं सामाजिक प्रश्नही निर्माण झालाय आणि त्यांचे गंभीर परिणाम ही दिसून येत आहेत. परभणीतील एका शेतकऱ्यानं लग्न जुळत नसल्यानं तणावाखाली येऊन आत्महत्या केलीय.
10 एकर बागायती शेती, तरीही लग्न होईना
मराठवाडा तसा कायम दुष्काळी पट्टा, कधी ओला तर कधी सुका दुष्काळाचं दुष्टचक्र कायम असते. नैसर्गिक संकटामुळे शेती व्यवसाय तोट्यात आल्यानं शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न जमत नाहीयेत. त्यातच नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यानं शिक्षण घेतलेले तरुण सुद्धा नाईलाजानं शेती व्यवसायाकडे वळतायेत.
परभणी जिल्ह्यातील 848 गावात सुमारे 25 हजार पेक्षा अधिक मुलांची लग्न मुलगी मिळत नसल्याने होत नाहीयेत.
परभणीतल्या एका तरुणांकडे 10 एकर बागायती शेती, बांधलेले घर तसेच कुटुंबाची गावात चांगली प्रतिष्ठा आहे. विशेष म्हणजे बीए केल्यानंतर मुलगा उत्कृष्ट शेती करतोय. तरीही या तरुणाला मागच्या सहा वर्षापासून सोयरिक येत नाहीयेत. यंदा लग्नाचे 72 मुहूर्त असतांना अनेक जण सोयरीक येण्याची प्रतीक्षा करतायेत.
नोकरी असणाऱ्यांना मुलींच्या पालकांची पसंती
पूर्वी ग्रामीण भागातील तरूण वधू-वर केंद्रामध्ये नोंदणी करत नव्हते. मात्र, आता या केंद्रांमध्येही नोंदणी वाढत आहे. शिकलेल्या मुली आणि त्यांचे पालक नोकरी असलेल्या मुलांनाच पसंती देत आहेत. समाजातील मुलींचे प्रमाण कमी झालंय. महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलीचे प्रमाण एक हजाराला 929 एवढे झालंय. सोलापुरात वर्षभरापूर्वी नवरदेवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लग्नाला मुलगी उपलब्ध करून घ्या म्हणून मोर्चा काढला होता. सातारा,बुलढाणा,हिंगोली येथे तरुणांनी यापूर्वी लग्न जुळत नसल्याने आत्महत्या केल्या. ग्रामीण भागातील ही सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.