कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं; अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात

Ajit Pawar :  आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र अर्थखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असलं आश्वासन दिलंच नव्हतं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकलेत. त्यामुळं महायुतीत चाललंय काय, आणि यात शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न पडलेत.   

वनिता कांबळे | Updated: Jan 11, 2025, 07:35 PM IST
कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं; अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात title=

Ajit Pawar On Farmers : अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी आणि महायुतीचे मतदार संभ्रमात पडलेत. कारण  विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यात भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे जाहीर केलं होते. मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंडमधील एका जाहीर कार्यक्रमातल्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झालाय.

आता यावरुन विरोधकांनीही रान उठवायला सुरुवात केलीय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यातच उल्लेख होता याची आठवण शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी करुन दिलीय. त्यांनी अनेक दाखले देत अजित पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त केलीय 

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी दिलाय. 
एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणताहेत. त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिलंय. अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूनच वाढवू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणालेत. तेव्हा भाजपनं मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचं दरेकरांच्या विधानावरुन दिसतंय. 

लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारखी आश्वासनं देऊन महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र आधी तिजोरीत पैसे नसल्यानं कर्जमाफीसाठी 4 ते 6 महिने वाट बघावी लागेल असं विधान काही दिवसापूर्वी पुण्यातल्या कार्यक्रमात कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं होतं. मात्र आता असं आश्वासन आपण दिलंच नव्हतं असं अर्थमंत्री अजित पवार म्हणताहेत. तेव्हा महायुतीतच आश्वासनांच्या बाबतीत एकवाक्यता नाही का, की तुमची आश्वासनं तुम्ही निस्तरा असा महायुतीतल्या मित्रपक्षांचा पवित्रा आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय.