विशाल करोळे (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर : विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर महायुतीत स्बळाचे वारे वाहतायेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार का असे संकेत सध्या मिळत आहेत. तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावरून स्पष्ट भूमिका घेतली नसली तरीह स्वबळाचे संकेत दिलेत.
विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय. मात्र असं असतानाही महायुतीतील संघर्षाची मालिका काही थांबताना दिसत नाही. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजूनही सुटलेला नाहीय. त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिन्ही पक्षांकडून स्वबळाचे संकेत देण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांना विचारूनच आगामी निवडणुकीत निर्णय घेणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलंय.
आगामी निवडणुका महायुतीनं एकत्र लढाव्यात अशी शिवसेनेची इच्छा असल्याचं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत. मात्र मित्र पक्षाची स्वतंत्र लढण्याची तयारी असेल तर आम्हीही वेगळं लढण्यास तयार असल्याची रोखठोक भूमिका शिवसेनेनं घेतलीय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेची वेगवेगळी मतं आहेत.. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं मात्र सावध भूमिका घेत तिन्ही पक्ष एकत्र बसून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीला अजूनही वेळ आहे. मात्र त्याआधीच महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुकीआधीच महायुतीतील तिन्ही पक्ष आपली ताकद वाढण्यावर भर देताहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की वेगळी चूल मांडणार हे पुढील पुढील काळात स्पष्ट होईल.