संतोष देशमुख प्रकरणात आका वाल्मिक कराड याचा आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. सुरेश धसांनी धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलं असताना अचानक त्यांच्या बंडोबाचा थंडोबा झालाय. धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी करणा-या सुरेश धसांनी अचानक धनंजय मुंडेंची भेट घेतली. मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली, या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी त्यांना दिवसा त्यांच्या स्वत:च्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची विचारपूस आणि लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, त्यात गैर काय? असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे भेटीत काही गैर नसल्याचं धस यांनी म्हटलं आहे.
हेसुद्धा वाचा - मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट आपणच घडवून आणल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या या भेटीवर मनोज जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केलीये. सुरेश धसांनी दगा केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही सुरेश धसांनी मुंडेंच्या घेतलेल्या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलंय. सुरेश धसांनी बीडच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. सुरेश धसांनी जे केलंय ती राजकीय सेटिंग असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी या प्रकरणात सावध भूमिका घेतलीये.
सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून फारकत घेतल्याचा आरोप होऊ लागलाय. पुढच्या काळात सुरेश धस वाल्मिक कराडवरही बोलणं बंद करतील तर त्यात नवल वाटणार नाही अशी चर्चा होऊ लागलीये.