Purchasing News vehicle : नव्या वर्षात नवी कार खरेदी करण्यासाठी अनेकांनीच तयारी केली असेल. काही मंडळींनी कुटुंबासाठी साजेशी, घराच्या पार्किंगमध्ये राहील अशी कार पाहिलीसुद्धा असेल. किंवा काही मंडळी कारचे पर्याय चाचपडत असतील. पण, या सर्व शोधमोहिमेला आता ब्रेक लागू शकतो आणि यामागे कारण ठरणार आहे ते म्हणजे एक नियम किंवा राज्य शासनाचं नवं धोरण.
येत्या काळात वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार राज्य परिवहन विभाग करत आहे. जपानच्या धर्तीवर राज्यात एक नवीन धोरण राबवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यासाठीचा आराखडाही तयार करण्यात आला असून, यामध्ये नव्या धोरणाचा समावेश असेल असं सांगण्यात येत आहे.
दिवसेंदिवस वाढती वाहतूक कोंडी, वाहनं उभी करण्यासाठी कमी पडणारी जागा, रस्ते अपघात, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी मुळातच वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा राज्य शासनाकडून केला जात आहे. ज्यामुळं आता थेट जपानच्या धर्तीवर नवं धोरण राज्यातही राबवलं जाऊ शकतं.
जपानमध्ये नवं वाहन खरेदी करण्याआधी ते उभं करण्यासाठीची जागा खरेदी करणं अपेक्षित असतं. महाराष्ट्रातही येत्या काळात असंच धोरण राबवण्याचा विचार परिवहन विभागाकडून केला जाऊ शकतो. दिवसागणिक वाढत्या वाहन खरेदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बहुविध देशातील पर्याय आणि धोरणं विचाराधीन ठेवत जपानच्या धोरणावर एकमत झाल्यानंतर तज्ज्ञ आणि शासकीय संस्थांसह चर्चेदरम्यान या धोरणाला हिरवा कंदिल मिळाल्यानंतर ते राज्य शासनाकडे पाठवलं जाणार आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात प्रत्येक वर्षी साधारण 5 ते 8 टक्के इतक्या फरकानं वाहन खरेदीचा वेग आणि प्रमाण वाढतं. नवनवीन वाहनतळं किंवा तत्सम सुविधाही यापुढं अपुऱ्या पडताना दिसतात. किंबहुना वाहनांचा एकूण खप आणि भविष्यातील त्यांची मागणी पाहता या सर्व सुविधा अपुऱ्या पडणं स्वाभाविक असल्यामुळं आता नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यच्या दृष्टीनं राज्यात पावलं उचलली जाऊ शकतात. त्यामुळं आतापासूनच नवं वाहन खरेदी करण्याचा विचार करण्यापूर्वी एक तयारी म्हणून वाहन उभं करण्यासाठीची जागा पाहून घ्या, अन्यथा वाहन खरेदी जवळपास अशक्यच!!!