सिंधुदुर्ग : नारायण राणे यांच्यावर सध्या शिवसेनेकडून जोरदार टीका केली जाते आहे. त्यामुळे सिंधुदुर्गतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेला इशारा दिला आहे. अन्य जिल्ह्यातील विषय रत्नागिरी जिल्ह्यात आणून भाजपा नेतृत्वावर टीका होत असेल, तर ती आम्ही सहन करणार नाही, त्याचे विपरीत परिणाम होतील असा सूचक इशारा भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला आहे.
भाजपचे कार्यकर्ते दुखावणार नाही, त्यांच्या भावनांचा अवमान होणार नाही याची दक्षता सेनेने घ्यावी असा इशारा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी शिवसेनेला दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळते आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडून सतत नारायण राणेंवर टीका होत असते. नारायण राणे यांच्यासह निलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची ही घोषणा केली गेली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीत नितेश राणेंच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी नारायण राणेंवर टीका केली होती.