Ajit pawar meeting with Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) झालेल्या अजित पवारांच्या बंडानंतर आता पुण्यातून (Pune News) मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे. त्यावेळी जयंत पाटील देखील बैठकीत उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 परिसरातील 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळजवळ अर्धा तास बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार आज पुण्यातील चांदणी चौकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. त्यानंतर त्यांचा मुक्काम सर्किट हाऊसमध्ये होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार आणि अजित पवार दोघांची भेट झाली. सोबत जयंत पाटीलही होते. अजित पवारांनी यावेळी काही प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडले. मात्र शरद पवार यांनी हे प्रस्ताव धुडकावून लावले आणि आपली आगामी रणनीती स्पष्ट केली. जयंत पवार यांनीही शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे या भेटीदरम्यान स्पष्ट केल्याची माहिती सुत्रांच्या अहवालातून मिळाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्यानंतर अजित पवारांची गाडी व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यातून बाहेर येत असताना अजित पवार यांची गाडी बंगल्याच्या गेटला धडकली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.