बदलापूर थेट तिसऱ्या मुंबईशी जोडणार; नवीन महामार्ग उभारणार, मुंबईत येणेही सोप्पे होणार!

Badlapur New Mumbai Highway: बदलापूर ते नवी मुंबई असा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. महामार्गाच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवालासाठी नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 31, 2025, 08:05 AM IST
बदलापूर थेट तिसऱ्या मुंबईशी जोडणार; नवीन महामार्ग उभारणार, मुंबईत येणेही सोप्पे होणार!  title=
badlapur will connected to third mumbai new expressway on the way

Badlapur New Mumbai Highway: बदलापूर, अंबरनाथच्या प्रवाशांना नवी मुंबई, मुंबईत जाणे सोयीचे व्हावे यासाठी बदलापूर ते नवी मुंबई असा महामार्ग उभारण्यात येणार आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे. 

बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली येथील रहिवाशांना मुंबई व नवी मुंबईत पोहोचण्यासाठी रेल्वे व रस्ते मार्गानेही जवळपास 1 ते 1.30 तासांचा प्रवास करावा लागतो. मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या या मार्गाचा विस्तार करण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतलं आहे. मुंबई-वडोदरा महामार्गावर चामटोली गावानजीक या महामार्गाला सुरुवात होत आहे. तर, बदलापूर-कटाई रस्त्याला हा मार्ग संपणार आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसरी मुंबई यांना बदलापूरशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या महामार्गाची लांबी 20.6 किमी लांबीचा महामार्ग असून यात 8 मार्गिका असणार आहेत. तसंच, सर्व्हिस रोडचादेखील समावेश असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 200 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. तसंच, या महामार्गावर 3 किमी लांबीचा बोगदादेखील असणार आहे. 

सध्या बदलापूरहून मुंबईत येण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. वाहतुककोंडीमुळं प्रवाशांना नाहक मनस्तापदेखील सहन करावा लागतो. मात्र या महामार्गामुळं प्रवासाच्या वेळात 60 मिनिटांचा तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांची बचत होणार आहे. या मार्गासाठी 10,833 कोटी रुपये खर्च येणार आहे. या मार्गाचा वापर करुन बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व डोंबिवली ते मुंबई व नवी मुंबई, असा 'अॅसेस कन्ट्रोल' एमएमआरडीएकडून आराखड्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या मार्गामुळं प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे.