Suresh Dhas on Will Dhananjay Munde Resign? भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्या पासून ते वाल्मिकच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्यांबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात बोलताना हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल तेव्हा यातून कोणीच सुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकारांनी धस यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना धस यांनी, "राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावर आम्ही बोलू शकत नाही. त्यांचा दबाव वाढलाय, दबाव जागेवर आहे की दबावच नाही हे मी काय सांगू शकतो? मी भाजपाचा माणूस आहे. मी भाजपावाला राष्ट्रवादीचं कसं सांगू? राष्ट्रवादीचा विचार राष्ट्रीय अध्यक्षांबरोबरच भुजबळ, तटकरे, पटेल यांनी करावा आणि काय तो निर्णय घ्यावा. राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नाबाबतीत माझ्यासारख्या पामरानं काय बोलावे?" असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.
या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी धस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना, "एखादी जरी त्रुटी पोलिसांकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही. या प्रकरणातील जे कोणी आका, बाका, काका, चाचा, मामा जे सगळे लोक आहेत या प्रकरणातील ज्यांनी ज्यांनी संतोष यांना अतिशय निर्घृणपणे हत्या केली ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी न्यायालयीन चौकशीचा फायदा होईल. लवकरात लवकर चौकशी पुरी करावी अशी मागणी आहे," असं धस म्हणाले.
नक्की वाचा >> वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'
वाल्मिक कराडच्या नावावर अमेरिकेत नोंद असणारं सीम कार्ड सापडलं आहे, असं म्हणत धस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना धस यांनी, "हा आका जो आहे तो सोपा आका नाहीये. तो 17-17 मोबाईल वापरत होता. तुम्ही ही नवीनच योजना मला सांगितली. तो करत असेल अमेरिकेवरील नंबरवरुन धमक्या वगैरे! आका काय काय नाही करु शकत? तो 50-50 लोकांना काही ठराविक रक्कम पाठवत होता," असं सूचक विधान केलं.
पुढे बोलताना वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरल्याचा उल्लेख करत सुरेध धस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, "सध्या रिल बघे नावाचा एक नवा आयटम तयार झाला आहे. त्यामधील ही पोरं आहेत," असा खोचक टोला लगावला.