Tata Fake Salt Sold: 'तुमच्या टुथपेस्टमध्ये मीठ आहे का?' हा प्रश्न एका प्रसिद्ध जाहिरातीमध्ये तुम्ही नक्की ऐकला असेल. पण आता तुम्ही खरं मीठ खात आहात की खोटं? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. म्हणजेच तुमच्या घरात येणारं मीठ आणि मसाले हे खरे आहेत की खोटे तुम्हाला ठाऊक आहे का? असं आम्ही यासाठी विचारतोय कारण सध्या बाजारामध्ये खोटं मीठ आणि बनावट मसाल्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे अन्न सुरक्षा आणि औषध विभागाने अशाचप्रकारे खोटं मीठ विकणाऱ्या एका कारखान्यावर छापेमारी केली आहे.
बाराबंकीमधील या छापेमारीमध्ये प्रसिद्ध मीठ निर्मिती कंपनी असलेल्या 'टाटा' कंपनीच्या मीठाची रिकामी पाकीटं सापडली आहे. तब्बल 6 हजार रिकामी पाकिटं अन्न सुरक्षा विभागाला सापडली आहे. या ठिकाणी मीठामध्ये भेसळ करुन ते ब्रॅण्डेड कंपनीच्या पाकिटांमध्ये भरलं जात होतं. छापेमारीमध्ये 6 हजार रिकाम्या पाकिटांबरोबर 250 मीठ भरलेली पाकिटंही जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अन्न सुरक्षा विभागाकडून माहिती देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
या कारखान्यामध्ये कपडे धुण्याच्या पावडरची 2 हजार रिकामी पाकिटांबरोबरच गोळ्या आणि चॉकलेट्सच्या पाकिटांबरोबरच मॅगी मसाल्याची रिकामी, बनावट पाकिटं आढळून आली आहेत. हा कारखाना आर. के. इंटरप्रायझेसच्या नावाने चालवला जात होता. ही कंपनी अर्पण उर्फ राहुल गुप्ता नावाची व्यक्ती चालवत होता, अशी माहिती अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त बी. के. सिंह यांनी दिली आहे.
अन्न सुरक्षा विभागाच्या टीमला शुल्काई गावामध्ये नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या पाकिटांमध्ये बनावट मीठ भरुन विकलं जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाच्या टीमने या कारखान्यावर छापेमारी केली. या टीमला पतंजलि ब्रॅण्डच्या 230 गोणी सापडल्या. या गोणींमध्ये सुटं मीठ भरलेलं होतं. तसेच टाटा कंपनीच्या 250 पाकीटांमध्ये भरलेलं बनावट मीठही या ठिकाणी सापडलं आहे. या छापेमारीमध्ये बनावट मसालेही जप्त करण्यात आले. या छापेमारीच्या आधीच्या दिवशी शांति विहार कॉलिनीमध्येही अन्न सुरक्षा विभागाने छापेमारी केली होती. अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कारखाने सील केले आहेत. तसेच टाटा आणि पतंजलि कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.