Republic Day 2025 No Maharashtra Tableau This Year Know Why: दरवर्षी प्रत्येक भारतीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे, 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन! या दिवशी नवी दिल्लीमधील कर्तव्यपथावर (आधीचा राजपथ) झेंडावंदनानंतर वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांचा नेत्रदीपक सोहळा पाहायला मिळतो. राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांबरोबरच वेगवेगळ्या संरक्षण दलांचे चित्ररथ, हवाईदलाकडून कर्तव्यपथावर होणारी पुष्पवृष्टी, पथसंचलन असा संपूर्ण सोहळा खरोखरच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा असतो. यंदाच्या वर्षीही हा सोहळा अगदी थाटामाटात साजरा झाला. यंदा हा सोहळा नेहमीपेक्षा उशीरा म्हणजे सकाळी 10 वाजता सुरु झाला. जवळपास अडीच तास चालेल्या या सोहळ्याला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदाच्या सोहळ्यामध्ये 31 चित्ररथ सहभागी झाले. मात्र यात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार हे आधीपासूनच स्पष्ट करण्यात आलेलं.
खरं तर दरवर्षी महाराष्ट्राचे चित्ररथ लक्ष वेधून घेणार असतात. अनेकदा महाराष्ट्राच्या चित्ररथांनी पुरस्कारही मिळवला आहे. दिवंगत कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी अनेकदा महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या थीमवर आधारित चित्ररथ तयार करुन राज्याला बक्षिस मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्राने 1971 ते 2023 या वर्षांमध्ये तब्बल 14 वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळवला आहे. विशेष म्हणजे या 14 पैकी 3 पुरस्कार सलग तीन वर्ष मिळाले आहेत. यंदाच्या वर्षी कर्तव्यपथावर गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ पाहायला मिळाले. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालचा चित्ररथ वगळण्यात आला होता. त्यावेळीही आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडण्यात आल्या होत्या. यंदा मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर दिसला नाही. यामागेही एक विशेष कारण आहे.
दरवर्षी चित्ररथांवरुन वाद होतात. त्यामुळेच या चित्ररथांचं नियोजन करण्याची जबाबदारी असलेल्या संरक्षण मंत्रालयाने तीन वर्षातून एकदा तरी प्रत्येक राज्याला चित्ररथ सादर करण्याचा नियम केला होता. केंद्र सरकारच्यावतीने संरक्षण मंत्रालयाकडूनच कोणकोणत्या राज्यांचे चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनामध्ये सहभागी होणार हे निश्चित केलं जातं. 26 जानेवारीला सामान्यपणे 26 चित्ररथ पथसंचलनात सहभागी होतात. यामध्ये 10 रथ हे मंत्रालय आणि 16 रथ हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतात. वेगवेगळी मंत्रालये, संरक्षण दलांनाही राखीव 10 रथांबरोबरच कधीतरी अधिकच्या पाच जागा दिल्या जातात. यंदा ज्या 16 राज्यांचे चित्ररथ कर्तव्यपथावर दिसले त्यामध्ये महाराष्ट्राचं नाव नव्हतं. आळीपाळीने दरवर्षी काही राज्य वगळली जातात आणि इतर काही राज्यांना प्राधान्य दिलं जातं. यामुळे सर्वांना समान प्रतिनिधित्व मिळतं. त्यामुळेच या वर्षी महाराष्ट्राचं नाव वगळण्यात आलेल्या राज्यांमध्ये असल्यानेच महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा कर्तव्यपथावर दिसला नाही.
कोणत्या राज्यांचे चित्ररथ दिसणार हे निवडणारी एक समिती असते. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणार आणि तज्ज्ञ मंडळी असतात. आधी सर्व इच्छूक राज्यांकडून त्यांच्या चित्ररथाची संकल्पना आणि मॉडेल कसं असेल याचं स्वरुप आणि आराखडा मागवला जातो. काही ठोस निकषांवर याची चाचपणी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या राज्यांच्या चित्ररथांचे थ्रीडी मॉडेल मागवले जातात आणि त्यानंतरच अंतिम यादी निश्चित केली जाते. यंदा सहभागी झालेल्या 31 चित्ररथांपैकी सर्वोत्तम चित्ररथ कोणता होता याची घोषणा पुढील काही दिवसांमध्ये संस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून केली जाईल.