Saif Ali Khan 25 Lakh Cashless Mediclaim: अभिनेता सैफ अली खान त्याच्या वैद्यकीय विम्यामुळे (Medical Insurance) अडचणीत येण्याची शक्यता आहे. अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पाच दिवस त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला. या उपचारांसाठी सैफला निवा बुपा या विमा कंपनीने वैद्यकीय विमा तातडीने मंजूर केला होता. मात्र आता सेलिब्रिटी असलेल्या सैफसाठी एवढ्या वेगाने मदतीला धावलेल्या कंपंनीविरोधात वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळींनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला (IRDAI) पत्र लिहिलं आहे. सैफ प्रकरणामध्ये 'विशेष प्राधान्यक्रम' देण्यात आल्याची तक्रार वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी केला आहे.
सैफ अली खानवर त्यांच्या वांद्रे येथील सदगुरु शरण इमारतीतील राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या बांगलादेशी चोराने चाकूने हल्ला केला. यानंतर सैफला पहाटेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर दोन शस्रक्रीया पार पडल्या. यासाठी सैफचा मेडिक्लेम तातडीने मंजूर करण्यात आला. सोशल मीडियावर यासंदर्भातील कागदपत्रंही व्हायरल झाली. या कागदपत्रांनुसार, सैफच्या उपचारांसाठी 36 लाखांच्या कॅशलेस उपचारांसाठी अर्ज करण्यात आला होता. या पैशांमध्ये पाच दिवस सैफवर रुग्णालयात उपचार केले जातील असं दर्शवण्यात आलेलं. मागण्यात आलेल्या पैशांपैकी विमा कंपनीने 25 लाखांचे कॅशलेस उपचार मंजूर केले. निवा बुपा या विमा कंपनीने प्री-ऑथोरेस्टेरिस्टेशन रिक्वेस्ट मंजूर केल्याचं सांगितलं असून पुढील रक्कम ही नियमांनुसार दिली जाईल असं म्हटलं आहे.
मुंबईमधील वैद्यकीय सल्लागारांच्या असोसिएशनने आयआरडीएआयला (IRDAI) पत्र लिहिलं आहे. या संस्थेमध्ये एकूण 14 हजारांहून अधिक डॉक्टर्स असून अनेक शहरांमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत. या पत्रामध्ये सैफला ज्या पद्धतीने कॅशलेस उपचारांसाठी विमा कंपनीने परवानगी दिली त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. "अभिनेता सैफ अली खानला त्याच्या विमा योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांचे कॅशलेस उपचार मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन आम्ही आमचा आक्षेप आणि चिंता नोंदवू इच्छीत आहोत. इतर विमाधाकरांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीपेक्षा सैफला देण्यात आलेली वागणूक ही विशेष आणि प्राधान्यक्रमाने होती," असं या पत्रात म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ...म्हणून महाराष्ट्र सरकार शाहरुख खानला देणार 9 कोटी रुपये; 'ती' एक चूक पडली महागात
सैफ आली खान प्रकरणामधून काही विशिष्ट विमाधारकांना खास वागणूक दिली जात असल्याचा ट्रेण्ड दिसून येत असल्याबद्दलही डॉक्टरांच्या संस्थेनं चिंता व्यक्त केली आहे. "या प्रकरणावरुन एक धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे ज्यामध्ये सेलिब्रिटी आणि उच्चभ्रू व्यक्तींबरोबरच कॉर्परेट विमा योजना असलेल्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि अधिक रक्कमेचे कॅशलेस उपचार दिले जात असताना सर्वसामान्य नागरिकांना गरजेपेक्षा कमी विमा संरक्षण आणि कमी दराने वैदकीय उपचारांचा परतावा (रिएम्बर्समेंट) यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे," असं संस्थेनं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"विम्याच्या माध्यमातून सर्वांना समान संरक्षण मिळालं पाहिजे. यामध्ये सदर व्यक्तीचे समाजिक स्थान पाहून त्याला प्राधान्यक्रम देण्याचे, विशेष वागणूक देण्याचे प्रकार घडता कामा नये. सेलिब्रिटींना विशेष वागणूक दिल्यास विम्यामध्येही दोन वेगवेगळ्या पद्धती तयार होतील. हे असं वागणं विमाधारकांच्या हक्कावर गदा आणणारं आणि नियमांना धरुन नाही. त्यामुळेच विम्यासंदर्भातील दावे आणि कॅशलेस उपचार याबद्दल अधिक पारदर्शकता असणं आवश्यक आहे," अशी मागणी डॉक्टरांच्या संस्थेनं पत्रातून केली आहे.
या प्रकरणामध्ये आयआरडीएआयने (IRDAI) विशेष लक्ष देऊन चौकशी करावी आणि सर्व विमाधारकांना त्यांचं सामाजिक स्थान काय आहे याचा विचार न करता समान वागणूक मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विमा मंजूर करताना विशिष्ट लोकांना प्राधान्यक्रम अथवा विशेष वागणूक देता कामा नये यासाठी नियम तयार करण्याची गरज असल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे. आता यावर IRDAI काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.