'...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले

Chhagan Bhujbal Exclusive Interview: छगन भुजबळ हे मागील काही काळापासून नाराज असल्याची जोरदार चर्चा असतानाच त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंबद्दल भाष्य केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2025, 01:04 PM IST
'...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले title=
भुजबळांनी प्रश्नाला अगदी स्पष्टच उत्तर दिलं

Chhagan Bhujbal Exclusive Interview: राज्यामध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे पक्षसहकारी आणि मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ आहे का यासंदर्भातील प्रश्नावर भुजबळांनी रोठठोक उत्तर दिलं आहे. 'झी 24 तास'च्या टू द पॉइण्ट या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये भुजबळांनी बीडच्या पालकमंत्रिपदासंदर्भातही मत व्यक्त केलं आहे.

मी उपदेश करण्याएवढा मोठा थोडी राहिलो आहे?

धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद न देणं योग्य वाटतं का? असा प्रश्नही भुजबळांना विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी, "पालकमंत्रिपद देणं न देणं हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आहे. अनेकदा इकडचा मंत्री तिकडचा पालकमंत्री असं केललं आहे. पण मला त्यातील काही माहिती नाही कारण मी आता त्यात नाहीये," असं उत्तर दिलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजित पवार बीडच्या पालकमंत्रिपदाला न्याय देऊ शकतील असं वाटतं का? असा पुढचा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. या प्रश्नावर, "आता मी कोण सांगणारा कोण कोणाला न्याय देऊ शकतं की नाही? जनतेच्या अपेक्षा असतील," असं विधान भुजबळांनी केलं. तसेच भुजबळांना, "तुम्ही अजित पवारांना काय सल्ला द्याल?" असं विचारण्यात आलं असता त्यांनी, "अरे ते उपमुख्यमंत्री आहेत. मी उपदेश करण्याएवढा मोठा थोडी राहिलो आहे?" असं खोचक विधान केलं. 

वाल्मिक कराडचा उल्लेख करत प्रश्न

वाल्मिक कराड प्रकरणाबद्दल बोलताना भुजबळांनी, "गुन्हा केला असेल तर संपूर्ण समाज तुम्ही कसा काय दोषी ठरणार?" असा सवाल उपस्थित केला. यावरुन भुजबळांना, "या प्रकरणात वारंवार अंगुलीदर्शन केलं जात आहे ते तुमच्याच पक्षाचे नेते धनंजय मुंडेंकडे केलं जात आहे. आरोपी वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. त्यांची आणि पर्यायाने पक्षाची ताकदच त्यांच्या मागे होती असा आरोप केला जातोय. पक्षाचे नेते म्हणून तुम्ही या आरोपांकडे कसे पाहता?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी, "मी या प्रश्नाला यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे. हे बघा, आमचे कोण ना कोण कार्यकर्ते असतात. तो कार्यकर्ता बाहेर जाऊन काय करतो कोणाला ठाऊक. त्याची जबाबदारीही आमच्यावर नसते. असे समोर येऊन फोटो काढतात ओ. आता समोर येऊन फोटो काढला तर तो कोण काय करतो कसं सांगणार ओ?" असा उलट सवाल विचारला. 

...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या

धनंजय मुंडेंबद्दल बोलताना "बरं, धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत ना? मग शहानिशा करा ना आरोपांची. ते स्वत: म्हणत आहेत करा चौकशी माझी काय कराची ती. मग काय असेल त्यांची चूक तर द्या त्यांना शिक्षा. साप साप म्हणून भूई थोपटणं बरोबर नाही ना," असं असं भुजबळ म्हणाले.