भिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार, 'हा' मेट्रो प्रकल्प थेट मध्य रेल्वेला जोडणार

Mumbai Metro 5 Update: मुंबई शहरात पोहोचण्यासाठी आता मेट्रो प्रकल्पांमुळं वेळ वाचणार आहे. या मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्यै जाणून घ्या.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 27, 2025, 11:12 AM IST
भिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार, 'हा' मेट्रो प्रकल्प थेट मध्य रेल्वेला जोडणार title=
Mumbai Metro Line 5 connect Thane to Bhiwandi to Kalyan to mumbai

Mumbai Metro 5 Update: शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबई शहराला इतर उपनगरातील इतर शहरांशी जोडण्यासाठी मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. मेट्रो लाइन 5 अंतर्गंत उभारण्यात येणाऱ्या ठाणे-भिवंडी कल्याण प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मेट्रो मार्गामुळं ठाणे ते भिवंडीदरम्यान कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. 2024 मध्ये एमएमआरडीएने मेट्रो मार्गांचा विस्तार केला आहे, त्यामुळे नाकरिकांना एमएमआरमध्ये कोणत्याही भागात प्रवास करता येणार आहे

ठाणे-भिवंडी-कल्याण असा हा मेट्रो लाइन 5 चा मार्ग आहे. 24.90 किमीचा हा मार्ग असून यात 17 स्थानके असणार आहेत. तसंच, मेट्रो 5 प्रकल्प मुंबई मेट्रोसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळं भिवंडीतून मुंबईत येणे आता सोप्पे होणार असून प्रवासही जलद होणार आहे. या प्रकल्पासाठी 8 हजार 416 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

मेट्रो मार्ग 5 हा सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -४ (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग- १२ (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांना जोडण्यात येणार आहे. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. तसंच, या मेट्रो मार्गामुळं सध्याच्या प्रवासाची वेळ 50 ते 75 टक्के पर्यंत कमी करेल. 

पहिल्या टप्प्यातील काम वेगाने सुरू

या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडीदरम्यान असून हा 11.9 किमीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गावर 6 स्थानके आहेत.  मेट्रो मार्ग 5 च्या पहिल्या टप्प्याचे काम पुर्णत्वाच्या दिशेने वेगाने सरकत असून या मार्गाचे जवळपास 94%  काम झाले आहे.  मार्गिकेला आवश्यक असणाऱ्या कशेळी डेपोच्या जमीनीचे अंशत: अधिग्रहण झाले असून उर्वरीत भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे.

अशी असतील स्थानके

१. बाळकुम नाका, २. कशेळी, ३. काल्हेर, ४. पूर्णा, ५.अंजुरफाटा, ६. धामणकर नाका, ७. भिवंडी, ८. गोपाळ नगर, ९. टेमघर, १०. रजनोली, ११. गोव गाव, १२ कोन गाव, १३. लाल चौकी, १४. कल्याण स्टेशन, १५. कल्याण एपीएमसी.