टोलचा झोल लपविण्यासाठी नेमले बाउन्सर

राज्यात आजही टोलचा झोल सुरु आहे. मात्र, तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.  

नितीन पाटणकर | Updated: Dec 26, 2018, 06:51 PM IST
टोलचा झोल लपविण्यासाठी नेमले बाउन्सर title=
Pic Courtesy : National Highways Authority of India

पुणे : राज्यात आजही टोलचा झोल सुरु आहे. मात्र, तक्रार देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही मार्गावरील टोलची मुदत संपूनही टोल घेणे सुरुच आहे. मात्र, जिल्ह्यात असा एक टोल नाका आहे की, तेथे झोल दिसून येत आहे. परंतु हा झोल लपविण्यासाठी चक्क बाउन्सरचा वापर करण्यात आलाय. पाटस टोल प्लाझावर हा झोल सुरु असल्याचे पुढे आलेय. 

पाटस टोल प्लाझावर झोल दिसत आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक होत असल्याची बाब पुढे आली आहे. बोगस पावत्या देऊन टोलची वसुली केली जातेय. यासाठी थेट बाउन्सर तैनात करण्यात आले आहेत. पुणे - सोलापूर राष्टीय महामार्गावरील पाटस टोल प्लाझावर ही लूट खुलेआम सुरु आहे. स्थानिक नागरिकांनीच हा धकाकदायक प्रकार पुढे आणला आहे. विशेष म्हणजे तक्रार करूनही पोलीस आणि नॅशनल हायवे अॅथॉरिटीचे अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील पाटस टोल प्लाझावर बाउन्सरची फौज दिसून येत आहे. बाउन्सरची ही फौज टोलच्या वसुलीसाठी तैनात करण्यात आली आहे. टोल भरणं बंधनकारक आहे. मग त्यासाठी पाटसच्या टोलवर थेट बाउन्सर का तैनात करण्यात आलेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, त्याचं उत्तर आहे, बोगस पावत्या देऊन पाटस प्लाझा येथे टोल घेतला जातोय, तसा स्थानिकांचा आरोप आहे.  

देण्यात आलेल्या टोल पावतीवर तारखेचा शिक्का मारण्यात आला आहे, तो २० डिसेंबरचा आणि याच पावतीवर छापलेली तारीख आहे ७ जानेवारी २०१९ आहे. थोडक्यात पुढच्या वर्षीची. यावर वाहनाचा नंबर नाही. काँट्रॅक्टरचे नाव नाही. बार कोड नाही. आपत्कालीन नंबर नाही. त्यामुळे ही बोगस पावती ग्राहकाच्या माथी मारली जाते आणि पैसे कोणाच्या खिशात जातात, हे सांगायला नको, हेच दिसून येत आहे.
 
टोलच्या पावती जे नमुद केलेले आहे, ते टोलवर देण्यात आलेल्या बोगस पावतीवर काहीही नाही. टोलच्या पावतीवर पुढच्या बाजूस आणि मागच्या बाजूस काय काय असायला हवे याची एक यादीच आहे.  

टोल पावतीच्या पुढील बाजूस याबाबी हव्यात

 १. वाहनाचा प्रकार आणि गाडीचा पूर्ण नंबर. 
२. टोल वसूल करणाऱ्या काँट्रॅक्टरचे नाव. 
३. लेन नंबर आणि ऑपरेटरचा नंबर. 
४. तारीख आणि वेळ. 
५. बार कोड. 
६. किती अंतरासाठी टोल आहे आणि टोल प्लाझाचे नाव. 

टोल पावतीच्या मागील बाजूस याबाबी हव्यात 

१. हेल्पलाईन नंबर. 
२. ऍम्ब्युलन्सचा नंबर. 
३. क्रेनचा नंबर. 
४. रोड पेट्रोल व्हेईकलचा नंबर. 
५. टोल प्लाझा मॅनेजरचे नाव आणि नंबर. 
६. इंडिपेन्डन्ट इंजिनिअरचे नाव आणि नंबर. 
७. प्रोजेक्ट डायरेक्टरचे नाव. 
 
ही सर्व माहीती टोल पावतीवर नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र यातील कशाचेच पालन पाटस टोल नाक्यावर होताना दिसत नाही. इथे चक्क बोगस पावत्या दिल्या जात आहेत, अशी माहिती तक्रारदार वसंत साळुंखे यांनी दिली. 

आता या बोगस टोल वसुलीला विरोध केला जाऊ नये यासाठी पाटस टोल प्लाझावर बाउन्सर तैनात करण्यात आल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. बरं जशी पावती बोगस तशीच टोल प्लाझावरील बाउन्सरची  नियुक्ती देखील बेकायदेशीर आहे. नॅशनल हायवे अॅथरिटीने टोलवरील सुरक्षा आणि इतर कर्मचाऱ्यांचा गणवेश कसा असावा याची नियमावली ठरवून दिली आहे. त्यात बाउन्सर आणि त्यांचा गणवेश याला मान्यता नाही. नॅशनल हायवे अॅथॉरिटीने बाउन्सर हटवण्यास देखील सांगितले आहे. मात्र, टोल कॉन्ट्रॅक्टरने हे आदेश धाब्यावर बसवल्याचं दिसत आहे. 

दरम्यान, नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांची देखील आम्ही यावर प्रतिक्रिया घेतली. याविषयीची तक्रार मिळालेली आहे. ही तक्रार इंडिपेन्डन्ट इंजिनिअर आणि टोल एक्सपर्टकडे पाठवलेली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अहवाल प्रतिकूल असल्यास कॉन्ट्रॅक्टर विरोधात निश्चित कारवाई केली जाईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, या विषयावर कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय.