मुंबई : छगन भुजबळ यांना बाहेर काढणे हे भाजपचे राजकारण आहे. पण, भाजपलाही एक्सपायरी डेट आहे आणि जनतेला हे कळते, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भुजबळांच्या जामिनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पाच लाखांच्या जात मुचलक्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केलाय. यामुळे, तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
जामीन मंजूर झाला असला तरी, भुजबळांच्या वकिलांना निकालाची प्रत सोमवारी मिळणार असल्यानं सोमवारीच त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची चिन्ह आहेत. सुटका झाल्यानंतर भुजबळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली होती. पण मनी लॉन्ड्रिंग कायद्यातलं कलम ४५ (१) रद्द झाल्यानं आज अखेर उच्च न्यायालयानं भुजबळांना जामीन दिला.
यानंतर, सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यानी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. 'भुजबळांवर करण्यात आलेल्या आरोपांवर चौकशीनंतर शिक्षा होईल... जामीन देण्यासाठी सरकारने उशीर लावला... कोर्टाने सांगितल्यानंतरही भाजप असं राजकारण करत असेल तर हे चुकीचंच आहे... भाजपच्या फायद्यासाठी सरकार त्यांना बाहेर काढणार असतील तर हे लोकांनाही कळतं...पण, भाजपलाही एक्सपायरी डेट आहे' असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केलीय.