Shiv Jayanti 2024 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी सोमवारी जगभरात साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहात ही साजरी केली जाणार आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीमध्ये सोमवारी मोठे बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सोमवारी सकाळी सात ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पुणे शहरातील मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवजयंती निमित्ताने पुण्यात मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येतात. यामुळे बाजीराव रस्ता, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते गर्दी संपेपर्यंत नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता बंद राहणार आहे. हे रस्ते बंद असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग –
जिजामाता चौक येथून शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक टिळक चौक ते टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
गणेश रस्ता – दारुवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक – दारुवाला पुल चौकातुन वाहचालकांना इच्छितस्थळी जाता येईल.
केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.
मिरवणुक लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतून वळविण्यात येईल.
पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालक पुरम चौकातून टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.
मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहनांना शनिवार वाड्याकडे न जाता येणार नाहीत. या वाहचालकांनी कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जावे.
दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातदेखील आजपासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी दिलेला उजवे वळण आणि यू टर्न बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोरील मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठात इच्छित स्थळी जाता येईल.