सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) हडपसर भागामध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून धारदार लोखंडी हत्याराने वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. सहा ते सात जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मुलाच्या हत्येनंतर वडिलांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर पोलिसांकडून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.सनी रावसाहेब कांबळे (25) अमन साजिद शेख, आकाश हनुमंत कांबळे,जय शंकर येरवळे यांच्यासह आणखी दोघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी संगनमत करुन पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्याऱ्याने अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर हल्ला करून हत्यी केली आहे. यानंतर आरोपींनी हातात शस्त्रे नाचवत आमच्यासोबत कोणी पंगा घेतला तर असाच एक एकाचा मुडदा पाडू असे ओरडत परिसरात दहशत पसरवली. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. एकीकडे पुणे पोलिसाने गणेश उत्सवाच्या काळामध्ये झाडाझडती करत असून त्यांना गुन्हेगार सापडत नाहीयेत. दुसरीकडे गणेशोत्सवाच्या आधीच धारदार शस्त्राने हल्ला करुन अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे पुण्यात मोठी दहशत निर्माण झालेली आहे.
यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यवाहीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कारण पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात सातत्याने असे प्रकार घडत असून पोलिसांना हे रोखण्यात मात्र यात अपयश येताना दिसत आहे. कितीही उपाययोजना केल्या तर पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी मात्र आटोक्यात येताना दिसत नाहीये. दुसरीकडे गुन्हेगारांचे मात्र दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पुण्यात गुंडाराज निर्माण झालंय का असा सवाल उपस्थित केला जात आहे.