Bettiah Royal Family News : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बेतियाचा शेवटचा राजा हरेंद्र सिंह यांच्या जतन केलेल्या मालमत्तेपैकी एका ट्रंक उघडण्यात आली आहे. यात मौल्यवान दागिने जप्त करण्यात आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाटणा शाखेच्या स्ट्राँग रूममध्ये ही ट्रंक सुरक्षित ठेवण्यात आली होती. आता राज्य सरकार बेतिया राजाच्या सर्व जंगम आणि मालमत्तेचे मूल्यांकन करत आहेत.
ही ट्रंक उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोन्याचे मणी आणि इतर दागिने आढळून आले आहेत. या शोधामुळे उर्वरित बॉक्समध्येही अशा मौल्यवान वस्तू असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे उर्वरित पाच बॉक्सही लवकरच उघडले जाणार आहेत.
तसंच मुंबईतील एका ज्वेलरने इम्पीरियल बँक ऑफ अलाहाबाद आणि पाटणा (आताची स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या शाखांमध्ये 1939 साली ठेवलेल्या रत्नांची किंमत अंदाजे 7 लाख 30 हजार 85 रुपये होती. यामध्ये अलाहाबाद प्रयागराज शाखेत ठेवलेल्या दागिन्यांची किंमत 5 लाख 21 हजार 102 रुपये आणि पाटणामध्ये ठेवलेल्या दागिन्यांची किंमत 2 लाख 8 हजार 983 रुपये आहे. त्यावेळी त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची किंमत 40 रुपये प्रति तोला आणि चांदीची किंमत 8 रुपये प्रति तोला ठरवली होती. हिरे जडलेल्या घड्याळाची किंमत त्यावेळी ज्वेलर्सने 51 हजार रुपये ठेवली होती, जी बँकांमध्ये ठेवण्यात आलीय.
गेल्या महिन्यात बिहार विधानसभेने एक कायदा मंजूर केला, त्यानंतर बिहार सरकारला बेतिया राजच्या सर्व संपत्तीचे अधिकार मिळाले. आता सरकार या मालमत्तांची चौकशी आणि मूल्यांकन करत आहे.
बेतिया राजच्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने या मालमत्ता आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. 1990 मध्ये बेतिया राज यांच्या संपत्तीतून हिरे आणि दागिन्यांची चोरी ही आशियातील सर्वात मोठी चोरी मानली जात होती.
बेतिया राज यांच्याकडे 15,358.60 एकर जमीन आहे, त्यापैकी 15,215.33 एकर बिहारमध्ये आणि 143.26 एकर उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर या जमिनीच्या अनेक भागांवर अतिक्रमण झालंय. त्यामुळे सरकारने या जमिनीच्या भागांवर पुन्हा हक्क सांगणे आणि त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असणार आहे.
बेतिया राजाचा शेवटचा राजा हरेंद्र किशोर सिंह यांचा 26 मार्च 1893 रोजी रहस्यमय मृत्यू झाला. त्याने दोनदा लग्न केली होती, तरी अपत्य नसल्यामुळे त्याच्या घराण्याला उत्तराधिकारी मिळू शकला नाही. राणी शिवरत्न कुंवर ही राजाची पहिली पत्नी म्हणून ओळखली जाते आणि राणी जानकी कुंवर त्यांची दुसरी पत्नी म्हणून ओळखली जाते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे राजाच्या मृत्यूनंतर राणी शिवरत्न कुंवर यांनी गादी घेतली. पण अवघ्या तीन वर्षांनंतर 24 मार्च 1896 रोजी त्यांचाही मृत्यू झाला.