सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार; पंकजा मुंडे भाजप बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

वनिता कांबळे | Updated: Jun 3, 2023, 04:20 PM IST
सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार; पंकजा मुंडे भाजप बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत  title=

Pankaja Munde :भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावर मुंडेंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी अत्यंत धडाकेबाज असे भाषण केले. यावेळी पंकजा यांची आक्रमक भूमिका पहायला मिळाली.  भाजप नेत्या पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी तसे संकते दिले आहेत. 

पंकजा मुंडे अमित शाह यांची भेट घेणार 

पंकजा मुंडे अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसंच जेव्हा भूमिका घ्यायची असेल तेव्हा सगळ्यांना बोलावून सगळ्यांच्या समोर बिनधास्त भूमिका घेणार, असंही त्या म्हणाल्या. त्यामुळे आता पंकजा नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

पंकजा मुंडे यांची भूमिका बदलण्याची भाषा

माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भूमिका बदलण्याची भाषा केली आहे.  मी कुणासमोरही झुकणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सध्या भाजपमध्ये नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे. असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी खूप काम केलं. त्यामुळेच आज सरकार पाहायला मिळतंय असंही त्यांनी बोलून दाखवल होते. काही मिळालं नाही तर मी ऊस तोडायला जाईन... असंही त्या म्हणाल्या होता. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 

पंकजा मुंडे नाराज का आहेत ?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं पंकजा मुंडेंना कुठलीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यांचं राजकीय पुनर्वसनही केलं नाही. त्यामुळं अधूनमधून त्यांची नाराजी उफाळून येते. मात्र यावेळी पंकजांच्या साथीला प्रीतम मुंडे देखील पुढं आल्यात आहेत.