IND vs PAK Pitch Report: चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात महत्त्वाचा सामना रविवारी दुबईमध्ये खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल. तर नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल. टीम इंडियाविरुद्धचा हा सामना पाकिस्तानसाठी 'करो या मरो' असा असेल. जर पाकिस्तानची टीम हरली तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. जर टीम इंडिया जिंकली तर ती थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी कशी असेल? हवामान कसे असेल? या मैदानावरील इतर क्रिकेट रेकॉर्ड काय सांगतात? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सहसा संथ असते. त्यामुळे फलंदाजांना धावा करणे कठीण होते. ही खेळपट्टी खालून पूर्णपणे काँक्रीटची आहे. येथे दोन खेळपट्ट्या पूर्णपणे नवीन आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने कोरड्या खेळपट्ट्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा बांगलादेशी टीमला काही फायदा झाला नाही.
हवामान पाहिलं तर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूमुळे स्विंग आणि बाउन्स मिळण्याची शक्यता आहे. सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची होत जाऊ शकते. जर फिरकीपटूंनी लवकर विकेट घेतल्या तर विरोधी टीमवरील दबाव वाढू शकतो. ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे हा सामना कमी धावसंख्येचा होण्याची शक्यता जास्त आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सामान्यतः कमी धावसंख्येच्या सामन्यांसाठी ओळखले जाते. या मैदानावर आतापर्यंत 59 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने 22 सामने जिंकले आहेत. नंतर फलंदाजी करणाऱ्या टीमने 35 सामने जिंकले आहेत. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने 28 सामने जिंकले आहेत. नाणेफेक हरलेल्या संघाने 29 सामने जिंकले आहेत. या मैदानावर आतापर्यंत १ सामना बरोबरीत सुटला आहे. तर एक सामना अनिर्णयित राहिला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना सुरु असताना पाऊस येण्याची शक्यता नाही. त्यामुळे खेळात कोणताही व्यत्यय येणार नाही. सामन्यावेळी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.सामन्याच्या पहिल्या भागात तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस राहील. सूर्यास्तानंतर तापमान 24-29 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हलके ढग असू शकतात तर वाऱ्याचा वेग 30 किमी/ताशी असू शकतो. संध्याकाळी हलके दव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे सामन्याच्या शेवटच्या सत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.