'आम्हाला किंमत मोजावी लागते,' अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले, 'नवीन गडी येतो अन् आमची वाट...'

फोटो काढू न दिल्यास नाराज होऊ नका. कधी कधी फोटोमुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते असा मिश्कील टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी लगावला आहे. वाल्मिक कराडसोबतच्या फोटोमुळे नेते अडचणीत आल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.   

शिवराज यादव | Updated: Jan 11, 2025, 07:00 PM IST
'आम्हाला किंमत मोजावी लागते,' अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले, 'नवीन गडी येतो अन् आमची वाट...' title=
(प्रातिनिधिक फोटो - @ajitpawarspeaks)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) फोटोचा आता धसकाच घेतल्याचं दिसत आहे. फोटोसाठी आग्रही कार्यकर्त्यांना अजितदादांचा मिश्किल टोला लगावला आहे. फोटो काढू न दिल्यास नाराज होऊ नका. कधी कधी फोटोमुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते असं अजित पवार म्हणाले आहेत. वाल्मिक कराडसोबतच्या फोटोमुळे नेते अडचणीत आल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली. गर्दीत एखादा नवा गडी येतो आणि वाटच लागते असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. पणदरे येथील नर्मदा किसन अॅग्रो उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 

"आता मी येथे येत असताना 10 ठिकाणी फोटोसाठी थांबवलं. फोटो काढू दिला नाही तर म्हणतात, काय राव अजून एक महिना झाला नाही यांचं बटण दाबून अन् गडी बदलला. थांबावं तर एखादा नवा चेहरा असा काही असतो की वाटच लागते. सध्याच्या पेपरला बातम्या पाहा. मंत्र्यांसह याचा फोटो, त्याचा फोटो. आता मी त्यादिवशी गेलो तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना हळूच फोटो काढला," असं अजित पवारांनी सांगितलं. 

"अलीकडे गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण फोटो नाही काढून दिला तरी नाराज होतात, अन गडी बदलला असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील आमच्यासोबत कोण फोटो काढत आहेत याची आम्हाला कल्पना द्यावी," असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी अजित पवारांनी वाल्मिक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं. सध्या राजकारण काय चाललं आहे ते पहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो  आहे. त्यामुळे सगळं आक्रीतच घडत आहे .त्यामुळे यदा कदाचित कोणाचा चुकीचा फोटो माझ्यासोबत आला, तर ते मला माहिती नव्हतं तो चुकून काढला आहे असं मी सांगेन. त्यामुळे आम्ही पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत. दोन नंबर वाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा," असं म्हणत अजित पवारांनी वाल्मिक कराडच्या फोटो प्रकरणावरून कार्यकर्त्यांना सल्ला दिला.