Mumbai Metro Full Speed : मुंबई इन मिनीटस् च्या दिशेनं एमएमआरडीएचे महत्वाचे पाऊल टाकले आहे. मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2ए या मार्गांवर 50 ते 60 किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता 80 किमी प्रति तास या वेगाने मेट्रो धावणार आबे. मेट्रोच्या पूर्ण गतीने संचालनासाठी सीसीआरएसकडून मंजुरी मिळाली आहे. मेट्रो लाईन 7 आणि 2 ए या दोन्ही मार्गांवर नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
मुंबईच्या मेट्रो नेटवर्कसाठी महत्त्वाचा टप्पा गाठत, रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांनी मुंबई मेट्रो लाईन ७ (रेड लाईन) आणि मेट्रो लाईन २ए (यलो लाईन) या दोन्ही मार्गांवरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान केले आहे. या उपलब्धीमुळे, तात्पुरत्या मंजुरीदरम्यान निर्धारित करण्यात आलेल्या अटींचे पूर्ण पालन सुनिश्चित झाले असून, मिळाली आहे.
दोन्ही लाईन्स एमएमआरडीएद्वारे चालवल्या जातात आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मेट्रो लाईन २ए दहिसर ते डीएन नगर हे 18.6 किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर 17 स्थानके आहेत.
मेट्रो लाईन 7 अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे 16.5 किमीचे अंतर असून या मार्गावर 13 स्थानके आहेत. या दोन्ही मार्गावरुन रोज 2.5लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. आतापर्यंत एकूण 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी या मेट्रो मार्गांवर प्रवास केला आहे.
एमएमआरडीएने चालकविरहित ट्रेन सेट्स, सीबीटीसी सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि नाविन्यपूर्ण तिकीट प्रणाली अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून मुंबईला सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम मेट्रो नेटवर्क देण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता केली आहे.