Nagpur News: ज्याच्याकडे उपचारासाठी जायच्या त्यानेच विश्वासघात केला, मानसोपचार तज्ज्ञाने अनेक तरुणींना...

Nagpur Crime News: नागपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मानसोपचार तज्ज्ञाने अनेक तरुणी आणि महिलांचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. 

अमर काणे | Updated: Jan 15, 2025, 12:27 PM IST
Nagpur News:  ज्याच्याकडे उपचारासाठी जायच्या त्यानेच विश्वासघात केला, मानसोपचार तज्ज्ञाने अनेक तरुणींना...  title=
nagpur news today young girls and women were sexually abused by psychiatrists in Nagpur

Nagpur Crime News: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मानसोपचार तज्ज्ञाने समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुणी आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी मानसोपचार तज्ज्ञ गेले अनेक वर्ष नागपुरात समुपदेशन केंद्र चालवत होता. तो नागपूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भातील शिबिरेही घेत होता. त्यामुळे त्याच्याकडे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करियर संबंधी अडचणींबद्दल समुपदेशन घ्यायला येत होते. 

समुपदेशनासाठी येणाऱ्या तरुणी आणि महिलांचे विविध आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर या अल्पवयीन मुली आणि तरुणींचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओही स्वतःकडे संग्रहित ठेवायचा आणि त्याच्या आधारे पुढेही त्या तरुणींना ब्लॅकमेल करायचा, अशी माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आरोपी मानसोपचारतज्ञाने सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे येणाऱ्या एका तरुणीला तिचे त्या काळचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या सबंधित तरुणीने हिम्मत करून पोलिसांकडे तक्रार केली. तेव्हा पहिल्यांदा या विकृत मानसोपचार तज्ज्ञांच्या अनेक वर्षांच्या कुकृत्यचा भांडाफोड झाला.

 पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवत आरोपी मानसोपचार तज्ज्ञावर पॉक्सो आणि लैंगिक छळाच्या आरोपात अटक केली आहे. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास केला तेव्हा मिळालेले पुरावे आणखी धक्कादायक होते आणि हे प्रकरण किती गंभीर आहे, हे दर्शवणारे होते. पोलिसांनी आरोपी मानसोपचार तज्ञाच्या कार्यालयातून एका हार्ड डिस्क जप्त केली आहे. त्यावरुन आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने आजवर अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गेल्या अनेक वर्षात या मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्यांची यादी बनवत त्यांच्याशी संपर्क करणे सुरू केले आहे. त्याच प्रक्रियेत चार जानेवारीला आणखी दोघींनी पोलिसांनी हिम्मत दिल्यामुळे याप्रकरणी तक्रार दिली आहे.

आतापर्यंत आरोपी मानसोपचार तज्ज्ञाविरोधात लैंगिक छळाचे एकूण तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहे.  प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याप्रकरणी महिला पोलिस अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी तसेच काही महिला काउंसलरचा समावेश असलेली विशेष समिती गठित केली आहे. ही विशेष समिती याप्रकरणी आणखी काही तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक छळाच्या घटना घडल्या आहेत का याचा शोध घेत आहे.