Mysterious Tiger In Maharashtra: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेला बिबट्यांचा वावर सर्वश्रृत आहे. मात्र धाराशीवमधील येडशी अभयारण्यामध्ये बिबट्याची दहशत असल्याने त्याला ट्रॅक करण्यासाठी वनविभागाने लगावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे धक्कादायक फुटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये बिबट्याऐवजी वाघच कैद झाला आहे. हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील आहे. हा वाघ नांदेड, अहमदपूर परिसरामधून मांजरा नदीच्या काठाने चालत चालत धाराशिव जिल्ह्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने तब्बल 53 वर्षानंतर या धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसून आल्याचं वन विभागाने म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वाघाने यवतमाळ ते धाराशीव हे 500 किलोमीटरचं अंतर कापलं आहे.
कॅमेरामध्ये कैद झालेला वाघ हा साधारण तीन वर्षांचा असून तो टिपेश्वरमधील टी-22 वाघिणीच्या पोटी जन्माला आल्याचं सांगण्यात आलं आहे. विदर्भामधून हा वाघ मराठवाड्यात चालत आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केला जात आहे. धाराशिवमधील रामलिंग अभयारण्याबरोबरच सोलापूरमधील बार्शीमध्ये वाघाचा वावर असल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र आता थेट कॅमेरात वाघ कैद झाल्याने या दाव्याला दुजोरा मिळाला आहे. या वाघाच्या पायाचे ठसे आणि कॅमेरामध्ये टीपलेल्या फोटोंच्या आधारे वाघ कोणत्या दिशेने मार्गक्रमण करतोय याचा शोध वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. सध्या हा वाघ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रांताच्या सीमेवर असला तरी तो विदर्भामधील टिपेश्वरमधून आल्याची माहिती समोर येत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यवतमाळ आणि धाराशीवमधील अंतर हे 500 किलोमीटरच्या आसपास आहे. या दोन्ही ठिकाणांदरम्यान वाघाने प्रवास केला असेल तर अनेक भागांमध्ये जंगल किंवा झाडी नाहीच. म्हणूनच या वाघाने हा 500 किलोमीटरचा नेमका प्रवास केला तरी कसा याबद्दलचं गूढ कायम आहे. तसेच हा वाघ कोणत्या दिशेने निघाला आहे, तो कुठे जाणार आहे? तो कशाचा शोधात आहे याबद्दलचे अनेक प्रश्न विचारले जात असले तरी ते अनुत्तरितच आहेत.
एकीकडे तब्बल अर्ध्या शतकाहून अधिक काळानंतर जिल्ह्यात वाघ दिसल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी एकट्याने फिरु नये, रात्री सोबत जाताना गाण्याचा मोठा आवाज करावा, जमीनीवर बसताना आजूबाजूच्या परिसरावर एकदा नजर टाकावी अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र अवघ्या 10 ते 12 दिवसामध्ये हा वाघ चालत 500 किलोमीटर अंतर कापून आला असला तरी त्याने या प्रवासात कोणावर प्राणघातक हल्ला केल्याचं, मानवी वस्तीत शिरल्याचं वृत्त नाही.