ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : महाराष्ट्र बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं हादरलेला असतानाच आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. जिथं, 'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल' अशी धमकी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी मिळाली आहे. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटात 100 रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली.
तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी बंद पाकीट दिलं. टपाल असल्याचे सांगत बंद पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितलं. याबाबत ढोकी पोलिसात तक्रार दिली असून पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. ढोकी पोलीसांकडुन या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, तानाची सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घराबाहेर काही महिन्यांपूर्वी गोळीबार झाल्याचीसुद्धा घटना घडली होती. 13 सप्टेंबर रोजी त्यांच्या घरावर मध्यरात्री उशिरा गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासूनच याप्रकरणाचा तपास सुरू असून, तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धोका असल्याचं म्हटलं जात आहे.