'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी, ज्यांनी महाराष्ट्राची..', राऊतांचा हल्लाबोल! संतापून म्हणाले, 'अजित पवारांनी तुमचा..'

Sanjay Raut Slams Sharad Pawar: मंगळवारी नवी दिल्लीमधील कार्यक्रमात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 12, 2025, 11:14 AM IST
'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी, ज्यांनी महाराष्ट्राची..', राऊतांचा हल्लाबोल! संतापून म्हणाले, 'अजित पवारांनी तुमचा..' title=
शरद पवारांवर राऊतांची टीका

Sanjay Raut Slams Sharad Pawar: मंगळवारी नवी दिल्लीमधील 'महाराष्ट्र भवन' सदनामध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्या हस्ते 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुकही केलं. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावायला नको होती. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे, असं मत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना कठोर शब्दांमध्ये संजय राऊतांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार एकनाथ शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर शरद पवारांनी या कार्यक्रमात केलेल्या जाहीर भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. "मला आनंद आहे की, आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली," असं शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवारांनी, "ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील," असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना, "एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे," असंही शरद पवारांनी म्हटलं.

नक्की वाचा >> 'भाजपा व राज ठाकरेंच्या ‘मनसे’ची ‘तन-मन-धना’ची..'; ठाकरेंच्या सेनेचे फटकारे! म्हणाले, 'मित्रपक्षाला..'

राऊतांनी काय आक्षेप घेतला?

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊतांनी, "ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो. त्यांच्यासोबत खुलेआम बसणे आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही," असं म्हटलं. "शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे," असंही राऊत म्हणाले.

आम्हाला तुमचं दिल्लीतील...

पुढे बोलताना, "कदाचित पवारांची भावना वेगळी असेल. आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही आपला आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शाहांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचं दिल्लीतील राजकारण माहिती नाही. पण आम्हालाही राजकारण कळतं, माननीय पवार साहेब," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच एकनाथ शिंदेंच्या मदतीने अमित शाहांनी शिवसेना फोडल्याचा संदर्भ देत शरद पवारांनी केलेला सन्मान हा एकनाथ शिंदेंचा नसून अमित शाहांचा असल्याचंही संजय राऊत म्हणाले. 

तुमचं आणि अजित पवार यांचं गुफ्तगू...

"राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजेत. तुमचं आणि अजित पवार यांचं गुफ्तगू होत असेल, तो तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे. अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, याचं भान राखून आम्ही पावलं टाकतो," असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.