Job News : 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 22 टक्के वाढीसह एकूण 164,500,000,000 बिलियनचं आर्थिक उत्पन्न असणाऱ्या जगविख्यात कंपनीकडे पैशांची काय कमतरता? असं अनेकजण सहजपणे म्हणून जातील. पण, याच कंपनीनं आता नोकरकपातीच्या आणखी एका सत्रात तब्बल 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा धक्काच बसला.
मागील वर्षामध्ये चांगल्या कामाचं प्रदर्शन करूनही कंपनीनं हाती नारळच दिल्यानं या कर्मचाऱ्यांना या प्रसंगी नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच लक्षात येईना. जगभरात मोठी आर्थिक उलाढाल असणारी ही कंपनी आहे मेटा (META). फेसबुकची (FACEBOOK) पॅरेंट कंपनी अशी ओळख असणाऱ्या मेटा कंपनीमध्ये कंपनीची पुनर्रचना प्रक्रिया सध्या कर्मचाऱ्यांच्या डोकेदुखीचं कारण ठरत आहे.
बिझनेस इनसायडरच्या वृत्तानुसार 2024 च्या पगारवाढीदरम्यानच्या प्रक्रियेमध्ये “At or Above Expectations” अर्थात अपेक्षेहून सुंदर आणि उल्लेखनीय काम हा शेरा मिळूनही अखेरच्या क्षणी जेव्हा या शेऱ्याचा पुन्हा आढावा घेण्यात आला तेव्हा मात्र त्यांना “Meets Most” म्हणजेच अनेक अपेक्षा पूर्ण केल्या असा खालचा शेरा देण्यात आला आणि याच कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा दणका सहन करावा लागला.
मेटामध्ये यापूर्वीही नोकरकपात झाली असून, तिथं सर्वाधिक कमी कामाचं योगदान असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढण्याचे निर्देश मॅनेजरना देणयात आले होते. पण, इतक्यावरच कंपनीचं लक्ष्य पूर्ण होताना दिसत नसल्यामुळं चांगलं प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करण्याच्या सूचना मॅनेजरना देण्यात आल्या.
मुख्य म्हणजे यावेळी चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोकरीला मुकावं लागल्यामुळं Layoff मेलनं अनेक कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपण कधी अशा यादीत येऊ याची अपेक्षात नसल्यानं अनेकांनाच हा धक्का पचवणं आव्हानात्मक ठरताना दिसलं. दरम्यान, जाणकारांच्या मते मेटामधहील ही नोकरकपात मार्क झुकरबर्गच्या त्या धोरणांपैकीच एक आहे जिथं ते कंपनीची कार्यक्षमता वाढवू पाहत आहेत. कंपनीमध्ये सध्या ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि वर्चुअल रियलिटी (VR) मध्ये अधिक गुंतवणूक करत असून, मशीन लर्निंग इंजीनियर्सच्या नोकरभरतीला प्राधान्य देत आहे.