Maharashtra Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पावसाळा थांबला असून, आता उन्हाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला आहे. थोरामोठ्यांच्या म्हणण्यानुसार होलिकादहनानंतर उन्हाळा वाढण्यास सुरुवात होते. पण, यंदा मात्र त्याआधीपासूनच तापमानवाढीला सुरुवात झाली आणि आता हे प्रमाण आणखी वाढताना दिसणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये असणारं ढगाळ वातावरण मात्र या परिस्थितीत अपवाद ठरणार असलं तरीही त्याचा फारसा फायदा मात्र होताना दिसणार नाहीये.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील तापमानवाढीचं सत्र सुरु होत असून ते सातत्यानं पुढील काही दिवसांसाठी सुरुच राहणार आहे. दुपारच्या वेळी अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांची तीव्रता अधिक प्रकर्षान जाणवणार आहे. तर, हवेतील आर्द्रतेच घट होणार असून, हवामान कोरडं राहणार आहे.
अकोला, वाशिम, यवतमाळ इथं तापमानाचा आकडा 38 अंशांवर राहील. तर, इथं वाऱ्याचा ताशी वेग 8 ते 10 किमी इतका अपेक्षित आहे. विदर्भात बहुतांशी तापमानाचा आकडा 38 अंश आणि त्याहून जास्त राहणार आहे. मराठवाड्यात हे प्रमाण 37 अंशांच्या घरात राहणार असून, इथं आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे.
कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्येही तापमानाचा आकडा वाढतानाच दिसणार आहे. इथं रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग भागांमध्ये तापमानाचा आकडा 36 अंशांच्या घरात राहणार असून, दुपारच्या वेळी उन्हाचा दाह आणखी वाढताना जाणवणार आहे.
सध्याच्या घडीला ला नीना स्थिती विकसित होताना दिसत असून, त्यामुळं यंदा सरासरीहून अधिक मान्सून पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. अरबी समुद्र, बंगलाचा उपसागर आणि हिंदी महासागरातील समुद्री पृष्ठाचं तापमान वाढल्यामुळं मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे.