कसली थंडी अन् कसलं काय? राज्यात उन्हासह पावसाचीही चाहूल? ढगाळ वातावरणानं वाढवली चिंता

Maharashtra Weather News : राज्याच्या तापमानात चढ उतार. कुठे घोंगावतायत पावसाचे ढग? पाहा सविस्तर हवामान वृत्त...   

सायली पाटील | Updated: Feb 5, 2025, 07:37 AM IST
कसली थंडी अन् कसलं काय? राज्यात उन्हासह पावसाचीही चाहूल? ढगाळ वातावरणानं वाढवली चिंता  title=
Maharashtra Weather news cloudy weather in vidarbha latest temprature updates

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय चढ उतार होण्यास सुरुवात झाली असून, उन्हाळ्याची चाहूल फेब्रुवारीपासूनच लागल्यानं ऐन उन्हाळ्यात नेमकी काय परिस्थिती असेल, याच विचारानं अनेकांना घाम फुटत आहे. मागील काही दिवसांमध्ये पहाटेच्या वेळी पडणारा गारठा वगळता राज्यातून खऱ्या अर्थानं आता थंडीनं काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं राज्यातील कमाल तापमानाचा आकडा वाढला असून, किमान तापमानातही वाढ होताना दिसत आहे. 

राज्यात सध्या विदर्भात तापमान 37 अंश, तर कोकणातील रत्नागिरी इथं पारा 36 अंशांवर पोहोचल्यामुळं कोकणापासून विदर्भापर्यंत थंडीचा कडाका बहुतांश प्रमाणात कमी झाल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दरम्यानच्या काळात राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही ढगाळ वातावरण चिंतेत भर टाकणार असून, यादरम्यान उष्मा जाणवण्याचं प्रमाणही वाढेल असा इशारा हवामान विभागाकडून दिला जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Breaking News LIVE UPDATES : दिवसभरातील ठळक बातम्यांचा वेगवान आढावा 

सध्या राजस्थान आणि नजीकच्या भागामध्ये चक्राकार वारे सक्रिय असून, अरबी समुद्राच्या आग्नेयेपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरातपर्यंत चक्राकार वारे सक्रीय असल्यामुळं मध्य भारतातही वाऱ्याचे जोरदार झोत वाहून येत असल्याचं चित्र आहे. परिणामी पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ क्षेत्रात याचा सर्वाधिक परिणाम दिसणार असून, वर्धा, अमरावती, वाशिम इथं तापमान 37 अंशांवर राहील. तर, राज्यातील किमान तापमान 19 अंशांदरम्यान राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं जारी केली आहे. 

देशातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास बुधवारी उत्तर आणि उत्तर पूर्व भारतामध्ये तापमान बहुतांशी सामान्य राहणार असून, आभाळ निरभ्र असेल. उत्तरेपासून पश्चिमेपर्यंत सहा किमी प्रति तास इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून, बहुतांश भागांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळेल. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये तापमानात पुन्हा एकदा घट अपेक्षित असून काश्मीर आणि हिमाचल प्रदेशासह उत्तराखंडमध्ये हा आकडा 7 ते 8 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे. अद्यापही पर्वतीय राज्यांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.