5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्याआधी गेल्या पाच वर्षांत राजकारण किती बदललं हे जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 15, 2024, 11:59 AM IST
5 वर्ष, 3 सरकारं, एकच व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री, 2 फुटलेले पक्ष अन्... महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडींची झलक title=
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Politics in Maharashtra how Changed Forever from 2019

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रात निवडणुका कधी जाहीर होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकींकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण कसं बदललं, याचा एक धावता आढावा घेऊयात. 

2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनतेने राजकारणातील अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या. महाविकास आघाडीचा जन्म, एकनाथ शिंदेंची बंडखोरी, देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी, असा अनेक घडामोडी या पाच वर्षात घडल्या. या घडामोडींवर एक नजर टाकूयात. 

- 2019 निवडणुका

2019 साली भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभा लढवली होती. भाजपला 105 जागांवर यश मिळालं होतं तर शिवसेना 58 जागांवर विजयी झाली होती. मात्र, निकाल लागताच मुख्यमंत्रीपदावरुन युतीचं बिनसलं आणि शिवसेना युतीतून बाहेर पडली. 

- महाविकास आघाडीचा जन्म

शिवसेनेना महायुतीतून बाहेर पडल्यानंतर नवी समीकरणं निर्माण झाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निर्माण झाली. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. 

- अजित पवार-देवेंद्र फडणवीस शपथविधी

एकीकडे राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू असतानात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा केला. राजभवनात देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 23 नोव्हेंबर 2019 चा हा पहाटेचा शपथविधी तेव्हा राज्यात खळबळ उडवून देणारा ठरला होता. 

- अजित पवार स्वगृही परतले

देवेंद्र फडणवीसांसोबत केलेला सत्तेचा प्रयोग हा 80 तासांतच फसला होता. कारण अजित पवार स्वगृही परतले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.

- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले...

अजित पवार स्वगृही परतल्यानंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वानुमते मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.

- एकनाथ शिंदेंचे बंड 

महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले आणि त्याला कारणीभूत ठरले ते एकनाथ शिंदे यांचे बंड. 2022 साली जून महिन्यात महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडताच एकनाथ शिंदे हे काही शिवसेना आमदारांना घेऊन सुरतला पोहोचले. त्यानंतर सूरतमार्गे ते गुवाहाटीला पोहोचले. एकनाथ शिंदे यांना 40 आमदारंचा पाठिंबा मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार पडले. 

- एकनाथ शिंदे मुख्यमंत्री 

शिंदे आमदारांसह मुंबईत परतल्यानंतर भाजपने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. दिनांक 30 जून 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार आलं. मात्र, त्यानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार यावरुन ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात संघर्ष पेटला होता. निवडणूक आयोगासमोरील याचिकेमध्ये आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली. पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळालं. तर, ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं. 

- अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रिपदी

2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम आणि संजय बनसोडे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात महायुती जन्माला आली. अजित पवारांच्या या भूमिकेला शरद पवारांचा पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

सध्याची स्थिती काय?

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची सध्याची स्थिती पाहता महायुतीच्या एकूण तीन घटक पक्षांकडे 178 पेक्षा अधिक आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीतील पक्षांकडे सध्या 75 आमदार आहेत. त्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हे चित्र बदलणार का? हे आता नोव्हेंबर अखेपर्यंतच समजणार आहे.