Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त

 Maharashtra Rain : महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस अद्यापही काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हजेरी लावून गेलेला नाही. त्यामुळं इथं चिंता वाढताना दिसत आहे.  

सायली पाटील | Updated: Sep 22, 2023, 06:16 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त  title=
maharashtra rain marathwada konkan to vitness good rainfall latest updates

Maharashtra Rain : यंदा पावसानं राज्याच प्रवेशही उशिरानं केला आणि तो खऱ्या अर्थानं मुसळधार बरसू लागला तोसुद्धा काहीसा उशिरानंच. असा हा पाऊस सध्या गणेशोत्सव गाजवताना दिसत आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळतेय. त्यातच पुढच्या 24 तासांमध्येसुद्धा पाऊस राज्याच्या बहुतांश भागांना ओलंचिंब करून जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं असलं तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देणार असून, तिथं उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार ही बाब मात्र नाकारता येत नाही.
 
फक्त कोकणच नव्हे तर, राज्यात सध्या वर्धा, चंद्रपूर, अमरावती यांसारख्या भागांमध्ये चांगला पाऊस होताना दिसत आहे. तिथं मराठवाड्यातही बीड, जालन्यात पावसानं हजेरी लावली आहे. पण, मराठवाड्यातील निवडक जिल्हे वगळता इतर भाग मात्र कोरडाच आहे. इथं मुंबईतही पावसाच्या सरी अधूनमधून आपल्या असण्याची जाणीवर करून देतात. पण, भर दुपारी येणारी सूर्यकिरणं अंगाची काहिली करताना दिसत आहेत. शुक्रवारीसुद्धा शहरात ऊन पावसाचा हा खेळ पाहायला मिळेल. ज्यामुळं वातावरण काही अंशी दमट असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाणे आणि पुण्यातच पुढच्या काही तासांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसणार असून, वादळी वारेही सुटण्याची शक्यता आहे. तर, सातारा, जळगाव, अहमदनगर, सांगली, लातूर, औरंगाबाद, रायगड, पालघरमध्ये पावसाची संततधार सुरु राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

देशातील 'या' राज्यांना पावसाचा अलर्ट

हवामान विभागानं पुढील 48 तासांसाठी उत्तराखंडमधील (Uttarakhand Rain Alert) 7 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिली आहे. येथील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर काही ठिकाणांवर गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. टिहरी, पौड़ी, नैनीताल, चंपावत, पिथौरागढ़, बागेश्वर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेसुद्धा वाचा : रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या

तिथं देशातील पूर्वोत्तर राज्यांमध्येही पावसाचं सत्र पुढच्या पाच दिवसांसाठी सुरुच राहणार आहे. ज्यामुळं पर्वतीय भागांमध्ये भूस्खलनाच्या घटनाही घडू शकतात. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.