BJP MLA Nitesh Rane : काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यानंतर आता नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय. हे पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही, असं नितेश राणेंनी म्हटलंय. माझे कितीही व्हिडिओ काढले तरी पोलीस ते व्हिडीओ फक्त बायकोलाच दाखवतील असंही नितेश राणे म्हणालेत.
भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा पोलिसांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत नितेश राणे बोलत होते. माझ्या कुठल्याही वक्तव्यावर पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही. ते व्हिडिओ काढतायेत पण घरी जाऊन फक्त बायकोला दाखवतील, असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केलं.
"मला काही करु शकणार नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायच आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे," असे नितेश राणे म्हणाले.
"तुम्ही काही चिंता करु नका. हे सरकार हिंदुत्ववाद्याचे आहे. सरकारमध्ये असे पर्यंत कुठल्याही हिंदूला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी केली आहे," असेही नितेश राणे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा? - विजय वडेट्टीवार
या व्हिडीओवरुन काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा..पोलिस माझे व्हिडिओ स्वतःच्या बायकोला दाखवतील, पण कुणी माझं वाकड करू शकणार नाही. महिलांचा अपमान करणारी, राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपने दिली का? महिलांचा अपमान करणारी, पोलिसांना आव्हान देणारी हीच का भाजपची संस्कृती? हीच का मोदी की गॅरंटी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा?," असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
याआधी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
माळशिरसमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बोलताना नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केले होते. 'नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा. विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरुप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला देतो,' असे नितेश राणे यांनी म्हटलं होतं.