अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?

Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता महायुतीतला बडा नेता शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 5, 2024, 03:04 PM IST
अजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार? title=

Maharashra POlitics : विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार चांगलेच अॅक्टिव्ह झालेले दिसतायत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Rastravadi Sharadchandra Pawar) जोरदार इनकमिंग सुरु आहे. पवारांची साथ सोडलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्रीही तुतारी फुंकण्याची इच्छा मनी बाळगून आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता महायुतीतला आणखी एक नेता शरद पवार गटाच्या वाटेवर आहे. 

घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बडे नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) लवकरच घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण जवळच्या खटके वस्ती इथं कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. आज रात्री कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचं रामराजे यांनी म्हटलं आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवारांची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे. नुकतंच अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी दीपक चव्हाण यांना जाहीर केली होती. त्यामुळे रामाजे नाईक निंबाळकर नाराज आहेत.

रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. 

कोण आहेत रामराजे नाईक निंबाळकर
रामराजे नाईक-निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29वे वंशज आहेत. रामराजे उच्चशिक्षित असून राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते प्राध्यापक आहेत. रामराजे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगराध्यक्षपासून केली. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि  विजयी झाले. शिवसेना-भाजप युतीच्या काळात  कृष्णा खोरे विकास महामंडळ ते उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते शरद पवारांबरोबर होते. 2004 मध्ये जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळला.

शरद पवार गटात इनकमिंग जोरात
गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसतेय.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या शरद पवारांच्या स्ट्राईक रेटची आजही चर्चा होते. लोकसभेत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणत पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एकहाती महाराष्ट्र पिंजून काढत पवारांनी लोकसभेला वारं फिरवलं होतं. आता विधानसभेतही पवार आपला करिष्मा दाखवतील अशी चर्चा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसतेय.