मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण

Maharashta Chief Minister:  देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा करण्यात आला आणि अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 4, 2024, 01:54 PM IST
मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण title=
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashta Chief Minister: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. विधानसभा निकालात मतदारांनी महायुतीच्या बाजून निकाल दिल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. अखेर या चर्चांवरुन पडदा उठला आहे.  विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या भेटीनंतर अखेर पक्षाच्या गटनेतेपदी एकमतानं देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला स्वीकृती देण्यात आली. पण मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्यास इतका उशीर का झाला? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. भाजपकडून यामागाचे कारण सांगण्यात आले आहे. 

विधीमंडळ पक्ष बैठकीमध्ये प्रस्ताव आणि त्यानंतर अनुमोदन प्रक्रिया पार पडली. विधीमंडळाच्या सर्वात मोठ्या पक्षाच्या गटनेतेपदी फडणवीसांचं नाव घेताच तिथं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठीचं अधिकृत पत्रक समोर आलं, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा करण्यात आला आणि अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. यावर भाजपचे निरिक्षक विजय रुपाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले रुपाणी?

केंद्राने महाराष्ट्रात 2 निरीक्षक पाठवले. ज्यामध्ये निर्मला सितारमण आणि विजय रुपाणी यांच्या नावाचा समावेश होता. रुपाणी यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. एकमताने निवड प्रक्रिया झाली आणि एकमताने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आल्याचे ते म्हणाले. आमची पार्टी सर्वानुमते निर्णय घेते. महायुतीत आम्ही निवडणूक लढवली. त्यामुळे सर्वांशी आम्ही बोललो, यामुळे निर्णय घ्यायला थोडा उशीर झाल्याचे रुपाणी म्हणाले. उद्या 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. सरकार बनवण्यासाठी आम्ही राज्यपालांना प्रस्ताव देऊ, असे ते पुढे म्हणाले.  

काय म्हणाले बावनकुळे?

एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलेलं काम लोकांना आवडलं. जनतेनं आम्हाला स्वीकारलं म्हणून आम्हाला हा विजय मिळाला. उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले. गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल तसा शपथविधी होईल. आमची पार्टी सामूहिक निर्णय घेणारी पार्टी आहे. आम्ही सर्वांशी चर्चा होते. महाराष्ट्राला पुढची 5 वर्षे न्याय मिळाला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित व्हायला उशीर झाल्याचे बावनकुळे म्हणाले.