'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया

Guardian Minister Of Beed: मागील अनेक आठवड्यांपासून सुरेश धस हे सातत्याने चर्चेत आहेत. आता पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर धस काय म्हणालेत पाहा

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 19, 2025, 08:44 AM IST
'बीडचे राजकारण, प्रश्न...', धनंजय मुंडेंऐवजी अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर सुरेश धसांची प्रतिक्रिया title=
धस यांनी एक खास पोस्टही केली

Guardian Minister Of Beed: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना होण्यापूर्वीच शनिवारी सायंकाळी महायुती सरकारकडून पालकमंत्र्यांची बहुप्रतिक्षित यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये काही प्रस्थापितांना डावलण्यात आल्याचं दिसून येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे वादात अडकलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी तसेच भाजपाच्या विधानपरिषद आमदार पंकजा मुंडेंनाही डावलण्यात आलं आहे. बीडचं पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आलं आहे. पुण्याच्या पालकमंत्रिपदाबरोबरच अजित पवार बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही पार पाडणार आहेत. अजित पवार बीडचे पालकमंत्री असतील असं जाहीर झाल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणावरुन वारंवार धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आधीपासूनच धस यांचा विरोध

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार घेतल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन वेळोवेळी बाजू मांडताना बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडेंना देऊ नये अशी भूमिका घेतली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही बीडचं पालकमंत्री व्हावं अशी इच्छा धस यांनी अनेक मुलाखतींमध्ये बोलून दाखवली होती. अखेर शनिवारी अजित पवारच बीडचे पालकमंत्री असतील असं स्पष्ट झाल्यानंतर धस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.  

धस काय म्हणाले?

"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार घेतल्यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. "आमची पहिल्यापासून मागणी होती बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं. आम्हाला खात्री आहे, अजित पवारांना बीड जिल्ह्यातील तळागाळातील माहिती असल्याने ते अतिशय योग्य काम करू शकतील. बीड जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी चार आमदारांची इच्छा होती की अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं. त्यामुळेच आजच्या या निर्णयाने आम्हाला अतिशय आनंद आहे. आम्ही अजित पवारांचे अभिनंदन करतो," असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List

सोशल मीडियावरही पोस्ट

धस यांनी अजित पवारांचं अभिनंदन करणारी एक पोस्टही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. "आदरणीय अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्याचे राजकारण, विकासाचे प्रश्न चांगल्या रितीने ओळखतात. त्यांच्या पालकमंत्री नियुक्तीमुळे विकासात्मक कामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही हा विश्वास वाटतो. तसेच बीड जिल्हयाच्या पालकमंत्रिपदाबाबत इतर सहकारी आमदारांसमवेत केलेल्या मागणीला स्विकारल्याबद्दल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार," असं धस म्हणालेत.

दादा विरुद्ध दादा चुरस असतानाच...

पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या चुरस होती. मात्र अजित पवारांकडे पुण्याबरोबरच बीडचंही पालमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचा पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना सांगलीचं पालकमंत्रिपद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. "चंद्रकांत दादांना सांगलीचा पालकमंत्रीपद मिळालं याचा आम्हा सर्वांना समाधान आहे. सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासामध्ये ते लक्ष घालतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे," असं जयंत पाटीसल म्हणाले आहेत.