निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाह अचानक महाराष्ट्र सोडून दिल्लीला रवाना! नेमकं काय झालं?

Amit Shah cancels Maharashtra rallies: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आज अनेक प्रचारसभा होणार होत्या. मात्र अमित शाह अचानक दिल्लीली रवाला झाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2024, 04:39 PM IST
निवडणुकीच्या रणधुमाळीत अमित शाह अचानक महाराष्ट्र सोडून दिल्लीला रवाना! नेमकं काय झालं? title=

Amit Shah cancels Maharashtra Election rally: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विदर्भातील आपल्या पूर्वनियोजित सर्व सभा रद्द केल्या आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला असल्याने अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व प्रचारसभा रद्द केल्या असून तात्काळ दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री ईशान्येकडील राज्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी बैठक घेऊ शकतात. मणिपूरमध्ये, शनिवारी रात्री इंफाळ खोऱ्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संतप्त जमावाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तीन आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या घराला आग लावली. सुरक्षा दलांनी यावेळी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या वडिलोपार्जित घरात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

सूत्रांनी सांगितलं की, महाराष्ट्रात भाजपाच्या प्रचार मोहिमेअंतर्गत अमित शाह काही प्रचारसभांमध्ये भाग घेणार  होते. मात्र त्यांनी प्रचारसभा रद्द केल्या असून, आता ते दिल्लीला परतत आहेत. त्यांच्या प्रचारसभा रद्द करण्यामागील नेमकं कारण अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, मणिपूरमधील अस्थिरता यामागील कारण असू शकते. सूत्रांनी सांगितलं आहे की, मणिपूरमधील स्थितीची माहिती घेण्यासाठी दिल्लीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली जाऊ शकते. 

मणिपूरमधील हिंसा कारणीभूत असल्याचा दावा

केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारला मदत केली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. हिंसाचाराच्या ताज्या घटना शनिवारी रात्री घडल्या जेव्हा जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची हत्या केल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी तीन राज्यमंत्री आणि सहा आमदारांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यानंतर राज्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये अस्थिरता

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संतप्त जमावाने सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कोंथुजम यांच्या निंगथोखाँग येथील निवासस्थानावर, लँगमेडोंग बाजारातील ह्यंगलामचे भाजप आमदार वाय राधेश्याम, थौबल जिल्ह्यातील वांगजिंग टेंथाचे भाजप आमदार पी. ब्रोजेन आणि खुंद्रकपाम पूर्व येथील काँग्रेसचे आमदार थोकचोम लोकेश्वर यांच्या घरांवर हल्ला केला आणि आग लावली. रविवारी सकाळी इम्फाळ खोऱ्यातील पाचही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती शांत पण तणावपूर्ण स्थिती होती. जिरीबाममध्ये सहा जणांचे मृतदेह सापडल्यानंतर झालेल्या हिंसक निदर्शनेनंतर कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.