Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनी ज्या मतदारसंघातून उमेदवार देणार आहे त्यांची यादी जाहीर केली असून, कुठे उमेदवार पाडणार तेदेखील सांगितलं आहे. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांचे उमेदवार तकलादू असतील असं म्हटलं आहे. जर अशा प्रवृत्तीची माणसं निवडून आली तर 2024 नंतर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपलेलं असेल असाही आरोप त्यांनी केला आहे.
"जरांगे पाटील जे उमेदवार देणार आहेत, तेथील उमेदवार त्यांना येऊन भेटलले आहेत. म्हणून त्या मतदारसंघांची नावं घेऊन मोकळे झाले आहेत. मला वाटतं तिथंदेखील उमेदवार मिळणार नाहीत. मिळाले तर एकदम तकलादू असतील. कोणाला तरी पाडण्यासाठी, कोणाला तरी निवडून आणण्यासाठी बारामतीच्या सांगण्यावरुन उमेदवार दिले असतील. त्यांच्या या उमेदवारांमध्ये काही ताकद नाही," अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
जरांगे कोणाला मॅनेज झाले आहेत? असं विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "जरांगे बारामतीला मॅनेज आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीसाठी त्यांनी काम केलं आहे. ओबीसीच्या नेतृत्वाला पाडलं आहे. ओबीसीच्या माणसांना टार्गेट करुन यांच्या सात पिढ्या राजकारणात पराभूत करा असं जरांगे म्हणाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. जरांगे हे तुतारीची सुपारी घेऊन काम करत आहेत".
जर अशा प्रवृत्तीची माणसं निवडून आली तर 2024 नंतर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपलेलं असेल अशी भितीही त्यांनी बोलून दाखवली आहे. जी माणसं भेटली त्यांच्या विरोधात ते उमेदवार देणार नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
यावर त्यांना प्रसारमाध्यमांनी हसन मुश्रीफ, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत या महायुतीच्या नेत्यांनीही भेट घेतल्याचं सागंण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, "आम्ही कोणत्याही उमेदवाराल सोडत नाही आहोत. महाविकास आघाडी असो किंवा महायुती, प्रहार मग कोणत्या आघाडीचा असो. आम्ही कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही आहोत. ज्यांनी ओबीसीच्या बाबतीत विरोधात भूमिका घेतली, जरांगेच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा दिला त्यांना ओबीसी मतदान करणार नाही".
"आमचं टार्गेच महाविकास आघाडीच आहे, कारण त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी जरांगेंना पाळलंय, पोसलंय, प्रमोट केलं आहे. आम्ही त्यांना का टार्गेट करु नये. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत," असा दावाही त्यांनी केला.