'लोकसभेत साहेबाला खुश केलं, आता मला खुश करा', अजित पवारांची बारामतीकरांना साद

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) अजित पवारांसाठी (Ajit Pawar) आता विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची असून बारामतीत त्यांच्यासमोर पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra PAwar) यांचं आव्हान आहे. दरम्यान अजित पवार सध्या बाराततीत तळ ठोकून बसले असून, 22 गावांचा दौरा करणार आहेत. 

शिवराज यादव | Updated: Nov 3, 2024, 04:18 PM IST
'लोकसभेत साहेबाला खुश केलं, आता मला खुश करा', अजित पवारांची बारामतीकरांना साद title=

Ajit Pawar on Baramati: लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) अजित पवारांसाठी (Ajit Pawar) आता विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपेक्षित यश मिळालं नाही. तसंच बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या पराभवाचा वचपा काढण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल. त्यातच शरद पवारांनी अजित पवारांसोर पुतण्या युगेंद्र पवार (Yugendra PAwar) यांचं उभं करत आव्हान आहे. त्यातच अजित पवार सध्या बाराततीत तळ ठोकून बसले असून, 22 गावांचा दौरा करणार आहेत. 

बारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा

 

लोकसभेला ताईला मतदान करून साहेबाला खुश केलं, आता या निवडणुकीत मला खुश करा असं आवाहनच अजित पवारांनी बारामतीकरांना केलं आहे. गावकऱ्यांसह संवाद साधताना त्यांनी ही मिश्किल टिप्पणी केली. लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी ताईला मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे त्यामुळे मला मतदान करून मलादेखील खुश करा असं ते म्हणाले आहेत. 

'बारामतीकरांनी ठरवलंय'

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये (Baramati) प्रचारा दरम्यान केलेल्या एका विधानाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे लोकसभा निवडणुकी दरम्यान बारामतीकरांनी ठरवल्याची आठवण अजित पवारांनी करून दिली. बारामतीच्या आखाड्यात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयांमध्ये झालेली लढत लक्षवेधी ठरली होती. तेव्हा बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना पसंती दिली होती.

अजित पवारांनी बारामती मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी त्यांनी तब्बल 59 गावांचा दौरा केला. लोकसभेप्रमाणेच बारामती विधानसभेलाही काँटे की टक्कर टक्कर होणार आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये जरी लढत होत असली तरी खरा सामना हा शरद पवार आणि अजित पवारांमध्येच आहे हे सांगायला कोण्या राजकीय पंडिताची आवश्यकता नाही. त्यामुळे अजितदादांनी लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा या बारामतीकरांच्या वायद्याची आठवण करून दिल्याचा त्यांना कितपत फायदा होतो हे पाहावं लागणार आहे.