Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात सत्तापालटही होऊ शकतो किंवा महायुती पुन्हा सरकार स्थापन करु शकते. मात्र 5 पैकी 4 एक्झिट पोलचा निकाल महायुतीच्या बाजूने आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी सर्व्हे केले असून त्यानुसार एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवले आहेत हे पाहूयात.
महाराष्ट्रासंबंधी 5 एक्झिट पोल समोर आले आहेत. यापैकी चौघांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. पाचही एक्झिट पोलचा एकत्रित निकाल पाहिल्यास महायुतीला 150 आणि महाविकास आघाडीला 120 जागा मिळतील. तसंच इतर पक्षांना 18 जागा मिळतील.
1) भास्कर रिपोर्ट्सनुसार, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. महायुतीला 125 ते 140 आणि महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील असा अंदाज आहे. तसंच इतरांना 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे.
2) न्यूज 18 मेट्रिजनुसार, महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 8 ते 10 जागा मिळतील.
3) चाणक्य स्टॅट्रेजीजनुसार, राज्यातील सत्तेच्या चाव्या महायुतीच्या हाती जातील. महायुतीला 152 ते 160 आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील. इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
4) पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला 122 ते 186 आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळतील. इतर पक्षांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
5) रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार, महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत आहे. महायुतीला 137 ते 157 आणि महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 2 ते 8 जागा मिळतील.
ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे निवडणूक सर्वेक्षण आहेत. ओपिनियन पोल निवडणुकीच्या आधी केला जातो. त्याचे निकालही निवडणुकीपूर्वी जाहीर होतात. यामध्ये सर्व लोकांना समाविष्ट केलं जातं. अर्थ सर्वेक्षणातील प्रश्नांची उत्तरे मतदारानेच दिली पाहिजेत असे नाही. या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांच्या आधारे जनतेच्या मूडचा अंदाज लावला जातो.
निवडणुकीदरम्यान एक्झिट पोल घेण्यात येतात. मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर त्याचे निकाल जाहीर होतात. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर एक्झिट पोल एजन्सीचे अधिकारी उपस्थित असतात. मतदान केल्यानंतर ते मतदारांना निवडणुकीशी संबंधित प्रश्न विचारतात मतदारांच्या प्रतिसादाच्या आधारे अहवाल तयार केला जातो. मतदारांचा कल कोणत्या दिशेने अधिक आहे, हे शोधण्यासाठी अहवालाचे मूल्यमापन केले जाते. यानंतर निकालांचा अंदाज लावला जातो.