Laxman Hake React On Drunk Video: ओबीसी आरक्षण टिकून रहावे म्हणून आंदोलन उभारणाऱ्या लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांदरम्यान सोमवारी रात्री पुण्यात राडा झाला. यावेळी लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी 'झी 24 तास'शी बोलातना हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपण मद्यप्राशन केलेलं नव्हतं. हा सारा आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे. लक्ष्मण हाकेंची वैद्यकीय चाचणी करण्याच्या मागणी नुसार चाचणी केली असता त्याचा अहवालही समोर आला आहे. लक्ष्मण हाके काय म्हणालेत आणि या अहवालात काय आहे पाहूयात...
लक्ष्मण हाके आज नागपूरमध्ये असून तिथेच त्यांनी काल रात्री घडलेल्या प्रकरणाबद्दल 'झी 24 तास'शी चर्चा केली. "ज्या वेळी एखादा नेता कोणत्या प्रकरणात सापडत नाही, एखादा नेता तात्विक, वैचारिक आणि संवैधानिक भाषा घेऊन चळवळ बनू पाहतो त्यावेळी त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आज लक्ष्मण हाके आहे. काल परवा छगन भुजबळ होते. त्या आगोदर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आज लक्ष्मण हाके त्या ठिकाणी आहे. पण लक्ष्मण हाके हा सामान्य धनगराचा, मेंढपाळाचा पोरगा आहे. समाजामध्ये तो ओबीसीचा आवाज बनू पाहतोय. त्याला प्रतिसाद भेटतोय. याच आकसापोटी माझ्यावर दारु प्यायल्याचा आरोप केला जात आहे. जर मी दारु प्यायलो असतो तर अर्ध्या तासात मी प्रसारमाध्यमांना कसा समोरे गेलो असतो?" असा सवाल हाकेंनी विचारला आहे. "महाराष्ट्रानं माझी पत्रकार परिषद पाहिली आहे," असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
"हा लक्ष्मण हाकेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. अरे, भेकडांनो 5-25 काय आडवे येता? एकट्याला गाठलं तुम्ही. लक्ष्मण हाके होळकरांची औलाद आहे. समोरासमोर युद्ध करणारा लक्ष्मण हाके आहे. तुमच्यात धमक आहे ना वेळ सांगून या. खरं तर ही चेतावनी समजा. लक्ष्मण हाके आजपर्यंत संविधान, कायदा आणि घटनेची भाषा बोलत आला. मात्र तुम्ही लक्ष्य करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. अजिबात लक्ष्मण हाके घाबरणार नाही," असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे. तसेच, "चार ते पाच दिवस मी सलाईनवर आहे. माझी औषधे सुरु आहेत," असंही लक्ष्मण हाकेंनी सांगितलं.
लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात लाक्षणिक वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या प्राथमिक अहवालात हाकेंनी दारु प्यायलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.