पोलिसच अंधश्रद्धेच्या आहारी! गुन्हे वाढत असल्याने पोलीस ठाण्याच्या गेटवर दिला बोकडाचा बळी

Latur Police News: दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर उपाय शोधत ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 7, 2024, 02:29 PM IST
पोलिसच अंधश्रद्धेच्या आहारी! गुन्हे वाढत असल्याने पोलीस ठाण्याच्या गेटवर दिला बोकडाचा बळी title=
Latur News Police sacrificed a goat to reduce crime shocking

वैभव बालकुंदे, झी मीडिया

Crime News Today: गुन्हेगारीवर आळा घालण्याचे काम हे पोलिसांचे असते. दिवसेंदिवस पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढत असल्याने पोलिसांनी केलेला अजब प्रकार पाहून तुम्हीदेखील डोक्याला हात माराल. लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ माजली आहे.    

दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर उपाय शोधत ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडल्याचे उघडकीस आला आहे.

वर्षभरापूर्वी एका अधिकाऱ्याने या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. मात्र, कारभार हाती घेतल्यापासून पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली. 

बोकडाचा बळी देण्यासाठी या वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारीदेखील सुरू केली. त्यानुसार एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि कसाई यांना पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातच बोकड कापण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आली. 

पोलिसच अंधश्रद्धेचा बळी पडत असतील तर सर्वसामान्यांमध्ये अंधश्रद्धेविरोधात जनजागृती कशी होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरात होत आहे. आता प्रशासन यावर काय तोडगा काढतंय हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

अंनिसकडून कारवाईची मागणी

पोलिस ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याच प्रकार समोर आल्यानंतर अनिसने कारवाईची मागणी केली आहे. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे ते असतांनाही पोलिस ठाण्याच्या समोर अंधश्रद्धेपोटी बोकडाचा बळी दिला असेल तर कायद्याचे हे अपयश आहे. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावा, अशी मागणी अंनीसची कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केली आहे.