Ladki Bahin Yojana No Next Installment: विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्वाधिक परिणाम करणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांची फेरतपासणी सुरु आहे. याचदरम्यान काही नियमांचं काटेकोरपणे पालन करुन काही हजार बहिणींची नावं या योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात आली आहे. मराठवाड्यातील 21 लाख 97 हजार 211 पैकी 55 हजार 334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द झाले आहेत. मराठवाड्यातून अर्ज केलेल्या 54 हजार 598 अर्ज अजून मान्यच झाले नसून, त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही. मराठवाड्यातील 55 हजार 334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी व इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाडा विभागातून 23 लाख 7 हजार 184 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यातील 21 लाख 97 हजार 211 अर्ज वैध ठरले असून अद्याप 54 हजार 598 अर्ज अद्याप मंजूर केलेले नाहीत
आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यांत ई-केवायसी सादर करावे लागेल. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखलादेखील द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील, असं सांगण्यात आलं आहे.
छात्रपती संभाजी नगर - 6655 महिला
धाराशिव - 2533 महिला
लातूर - 8001 महिला
जालना -9622 महिला
हिंगोली - 5825 महिला
परभणी - 2802 महिला
बीड - 9364 महिला
नांदेड - 10532 महिला
एकूण - 55334 महिला
दरम्यान, या योजनेमधून हजारो महिलांना वगळण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. "लाडकी बहिण योजनेमधून अनेक लाडक्या बहिणी बाहेर काढले जात आहे. सरकारकडे जाहिरात द्यायला पैसे आहेत. 15 टक्के वेळ सरकार आणि 85 टक्के वेळ प्रायव्हेट लोकांसाठी सरकार जाहिरातबाजी करते," असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. सोमवारी कोल्हापूरात भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यशाळेचा आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात बावनकुळेंनी, "लाडक्या बहिणी, शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थीशी संपर्क करा आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे सभासद करून घ्या," असं विधान केलं. बावनकुळे यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.