कल्याण : कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. तसंच तिसऱ्या प्रस्तावित पुलाचं काम जून २०२०मध्ये सुरू होईल. पत्री पुलाच्या गर्डरचं काम ५० टक्के पू्र्ण झालंय. गर्डर तयार करण्याचे काम हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये सुरु आहे. कामाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी हैद्राबादला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसीचे मुख्य अभियंते, कार्यकारी अभियंता, कंत्रटदार व ग्लोबल स्टील पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याणमधला पत्री पूल २०४ वर्षानंतर इतिहासजमा झाला. वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर करण्यात आल्यानं हा पूल पाडण्यात आला होता. १९१४ साली हा पूल बांधण्यात आला होता. शिसे आणि लोखंडमिश्रित पत्रीपुलाचे वजन १२० टन होते. पुलामध्ये ६० टनाचे दोन गर्डर होते. ते काढण्यासाठी पूर्वेकडील बाजूला ६०० टन क्षमतेची क्राउल क्रेन, तर पश्चिमेकडील बाजूला ४०० टन क्षमतेच्या क्राउल क्रेनचा वापर करण्यात आला. या क्रेनव्यतिरिक्त २५० टन आणि रेल्वेची १४० टनची क्रेन आणण्यात आली होती.
पत्री पुलाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे लोकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून संताप्त व्यक्त होत आहे. आता हा पूल कधी बनणार याकडे कल्याणच्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे.